Assembly Election Result 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून कडक सुरक्षेत मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालांनी अनेक राज्यांमधील प्रस्थापित सत्तासमीकरणे बदलून टाकली असून काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आपले गड राखले आहेत, तर काही ठिकाणी मतदारांनी सत्तापरिवर्तनाचा स्पष्ट कौल दिला आहे.
१. पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; भाजपची ऐतिहासिक मुसंडी-
पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला खिंडार पाडले आहे.
भारतीय जनता पक्ष (BJP): १९० जागा (बहुमतासह आघाडीवर)
तृणमूल काँग्रेस (TMC): ९४ जागा
काँग्रेस: २ जागा
डावे पक्ष: २ जागा
इतर: २ जागा
२. तामिळनाडू: ‘थलपती’ विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा धमाका
तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाने राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज मोडीत काढले आहेत. पहिल्याच निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांना मागे टाकत तब्बल १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
टीव्हीके (TVK): १०९ जागा
अण्णाद्रमुक (AIADMK): ६५ जागा
द्रमुक (DMK): ६० जागा
इतर: ९ जागा
३. केरळ: डाव्यांचा गड कोसळला; काँग्रेसप्रणीत यूडीएफची मुसंडी
केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला (LDF) यंदा मतदारांनी नाकारले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) येथे सत्तापरिवर्तन घडवून आणले असून डाव्यांचा शेवटचा बालेकिल्ला ढासळला आहे.
काँग्रेस (UDF): ९८ जागा
डावी आघाडी (LDF): ४० जागा
इतर: २ जागा
४. आसाम: भाजपने राखली सत्ता; हॅट्ट्रिककडे वाटचाल
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. गेल्या दोन टर्मपासून सत्तेत असलेल्या भाजपने यंदाही आपली पकड अधिक मजबूत करत स्पष्ट बहुमताचा टप्पा पार केला आहे.
भारतीय जनता पक्ष (BJP): ९७ जागा
काँग्रेस: २४ जागा
इतर: ५ जागा
५. पुद्दुचेरी: भाजपची सत्ता कायम
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. येथे एकूण ३० जागांपैकी २२ जागांवर आघाडी घेत भाजपने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे.
भारतीय जनता पक्ष (BJP): २२ जागा
काँग्रेस: ६ जागा
इतर: १ जागा
महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकांचे सविस्तर निकाल-
५ राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे निकालही समोर आले आहेत, ज्यामध्ये महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: अक्षय कर्डिले विजयाच्या उंबरठ्यावर-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत १७ व्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
अक्षय कर्डिले (भाजप): १७ व्या फेरीअखेर ७० हजारहून अधिक मतांची अभूतपूर्व आघाडी घेत विजयाकडे कूच केली आहे.
गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी – शरद पवार गट): ते दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी कर्डिले यांच्या मतांच्या तुलनेत ते खूप पिछाडीवर आहेत.
रावसाहेब खेवरे (अपक्ष): यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळवून तिसरे स्थान राखले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांची ऐतिहासिक आघाडी
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत १७ व्या फेरीअखेर ‘वहिनी’ म्हणजेच सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
१७ व्या फेरीची अधिकृत आकडेवारी-
फेरीत झालेले एकूण मतदान: ९,१६१ मते
सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते: ८,९६७ मते
इतर उमेदवारांना मिळालेली मते: १९४ मते
१७ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांचे एकूण मतदान: १,५०,८७६ मते










