Empire State Building Proposal: प्रेमासाठी लोक काय करतील याचा नेम नाही, पण एका रशियन जोडप्याने जे केले ते पाहून संपूर्ण न्यूयॉर्क शहर हादरून गेले आहे. न्यूयॉर्कमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या 1,454 फूट उंच ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’च्या टोकावर चढून एका जोडप्याने जगाला शांततेचे आवाहन केले.
एवढ्या उंचीवर मृत्यूशी खेळ खेळल्यानंतर या तरुणाने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केले. हा संपूर्ण थरार सोशल मीडियावर लाईव्ह दाखवण्यात आला. मात्र, हा खतरनाक स्टंट संपवून खाली येताच न्यूयॉर्क पोलिसांनी या जोडप्याला तात्काळ अटक केली.
काळ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला मास्क लावलेले अँजेला निकोलाउ आणि व्यान्या बीरकुस हे दोघे या गगनचुंबी इमारतीवरील अत्यंत अरुंद अशा ट्रान्समिशन टॉवरवर (अँटेना) चढले होते.
🚨 BREAKING: 2 people have climbed the Empire State Building in New York to fly a flag. The flag reads “When the power of love beats the love of power the world knows peace.” pic.twitter.com/YrIudqf9Lx
— FOX 4 NEWS (@FOX4) July 1, 2026
अँटेनाच्या टोकावर फडकवला बॅनर; चुकून झाला गिटार वादकाचा उल्लेख
दुपारच्या सुमारास जेव्हा इमारतीवर पर्यटकांची गर्दी होती, तेव्हा हे दोघे अँटेनाच्या लाल दिव्याच्या अगदी जवळ पोहोचले. तिथे त्यांनी एक मोठा काळा बॅनर फडकवला, ज्यावर लिहिले होते: “जेव्हा प्रेमाची ताकद ही सत्तेच्या हव्यासापेक्षा मोठी होईल, तेव्हा जगात शांतता पसरेल.”
हा सुप्रसिद्ध विचार महान गिटार वादक जिमी हेंड्रिक्स यांचा असल्याचे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात हे विधान 19 व्या शतकातील ब्रिटिश राजकारणी विल्यम ग्लॅडस्टोन यांचे आहे.
हा संदेश दिल्यानंतर दुपारी 12:30 च्या सुमारास दोघे अँटेनावरून थोडे खाली आले. तिथे तरुणाने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीला अंगठी घालत प्रपोज केले. मुलीने होकार देताच दोघांनी मास्क काढून एकमेकांना मिठी मारली.
कोण आहेत हे धाडसी ‘स्कायवॉकर्स’?
अँजेला निकोलाउ ही स्वतःला एक कलाकार मानते, जी भीती आणि स्वातंत्र्याचा शोध घेण्यासाठी ओळखली जाते. हे जोडपे जगातील सर्वात उंच इमारतींवर चढण्यासाठी आधीच प्रसिद्ध आहे.
- यापूर्वीचे स्टंट्स: त्यांनी यापूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील बे ब्रिज आणि क्वालालंपूरमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत असलेल्या ‘मर्डेका 118’ वरही असेच धोकादायक स्टंट्स केले आहेत.
- नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री: त्यांच्या या थरारक प्रवासावर 2024 मध्ये नेटफ्लिक्सवर ‘स्कायवॉकर्स: ए लव्ह स्टोरी’ नावाची एक प्रसिद्ध डॉक्युमेंट्री देखील रिलीज झाली आहे.
जीवाला मोठा धोका; शास्त्रज्ञांनी दिला इशारा
एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या प्रवक्त्याने सांगितले की, या जोडप्याने कोणतीही परवानगी न घेता हा बेकायदेशीर स्टंट केला आहे. खरं तर, याच इमारतीच्या गॅलरीतून सुरक्षितपणे प्रपोज करण्यासाठी 1,000 डॉलर्सचा अधिकृत पॅकेज उपलब्ध आहे.
तज्ज्ञांच्या मते, या टॉवरवर कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय चढणे म्हणजे आत्महत्येसारखे आहे. या टॉवरमधून हाय-व्होल्टेज रेडिओ आणि टीव्ही सिग्नल्स प्रसारित होत असतात. तिथे विजेचा प्रवाह खूप जास्त असतो, ज्यामुळे एका छोट्या चुकीनेही व्यक्तीचा जागीच मृत्यू होऊ शकतो.
पोलिसांची अॅक्शन आणि वडिलांचा अजब बचाव
हा प्रकार पाहताच खाली पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि आकाशात हेलिकॉप्टरद्वारे पाळत ठेवली. हे जोडपे खाली येताच पोलिसांनी त्यांना शांततेत ताब्यात घेतले.
दुसरीकडे, रशियन सर्कस कलाकार असलेल्या अँजेलाच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. “कोणत्याही देशाच्या कायद्यानुसार इमारतीवर चढणे सामान्य गोष्ट आहे. मी स्वतःही अनेकदा छतांवर चढतो, त्यामुळे मला तिची काळजी वाटत नाही,” असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा – Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा










