Gold Silver Rates : गेल्या तीन महिन्यांपासून मध्यपूर्व आशियात धुमसणाऱ्या भू-राजकीय तणावाचे सावट आता जागतिक बाजारपेठेवर गडद झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता वाटाघाटी निष्फळ ठरल्याने निर्माण झालेली अनिश्चितता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारतासह जागतिक कमोडिटी बाजारावर झाला असून, सोने आणि चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे.
महागाई आणि रुपयाची घसरण
मध्य आशियातील अस्थिरतेमुळे इंधन टंचाईचा धोका निर्माण झाला असून, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर महागाईचा भडका उडाला असून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतासाठी सोन्याची आयात अधिक खर्चिक झाली असून, त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीकडे आपला मोर्चा वळवला आहे, ज्यामुळे मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
देशातील सोने-चांदीचे ताजे दर
बुलियन असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,४४० रुपयांवर (GST शिवाय) पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली असून, प्रति किलो चांदीचा भाव २,७२,६५० रुपयांवर गेला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५७,८७० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा दर २,७१,९२० रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात स्थिरता असली तरी चांदीच्या किमतीत १,८८० रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रमुख शहरांमधील दरपत्रक (प्रति १० ग्रॅम)-
१. मुंबई व पुणे: या दोन्ही शहरांत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५८,२८० रुपये असून, २२ कॅरेटसाठी १,४५,०९० रुपये मोजावे लागत आहेत.
२. नागपूर: विदर्भाची राजधानी असलेल्या नागपुरातही मुंबई-पुण्याप्रमाणेच सोन्याचे दर १,५८,२८० रुपये (२४ कॅरेट) आणि १,४५,०९० रुपये (२२ कॅरेट) इतके आहेत.
३. चेन्नई: दक्षिणेकडील चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक असून, २४ कॅरेटसाठी १,५८,७४० रुपये तर २२ कॅरेटसाठी १,४५,५१२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
किमती वाढण्यामागची प्रमुख कारणे-
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे (US Fed) चलनविषयक धोरण आणि डॉलरची मजबूती यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आहे. शांतता कराराच्या चर्चेदरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक नाजूक झाली आहे.










