ISRO Scientist Resignation : भारताची प्रतिष्ठित अंतराळ संस्था ‘इस्रो’ (ISRO) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) या दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्थांशी संबंधित घडामोडींवर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. अंतराळ विभागाने (DoS) नुकताच इस्रोमधील ग्रुप ‘A’ श्रेणीतील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आणि स्वेच्छानिवृत्तीबाबत एक कडक आदेश जारी केला आहे.
विशेषतः भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मानवरहित अंतराळ मोहीम ‘गगनयान’ आणि इतर महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्सशी जोडलेल्या शास्त्रज्ञांचे राजीनामे आता सरसकट स्वीकारले जाणार नाहीत. यु. आर. राव सॅटेलाइट सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांसारख्या प्रमुख केंद्रांना १४ जुलै रोजी हा विशेष मेमो जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या सामूहिक एक्झिटमुळे (मास एक्झोडस) हा निर्णय घेतल्याची चर्चा असताना, जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ प्रशासकीय कारणांसाठी घेण्यात आला आहे जेणेकरून कोणत्याही महत्त्वाच्या राजीनाम्यावर उच्च आणि अनुभवी पातळीवर योग्य निर्णय घेतला जाऊ शकेल.
सोमनाथ निवृत्त झाले तरी गगनयान थांबणार नाही; मंत्र्यांचा विश्वास
इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी इस्रोच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले:
- माजी इस्रो प्रमुखांची नवी इनिंग: जानेवारी 2025 पर्यंत इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिलेले आणि चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसह आदित्य-L1 मोहिमेचे नेतृत्व करणारे डॉ. एस. सोमनाथ आता ‘अग्निकुल कॉस्मॉस’ या अंतराळ क्षेत्रातील खाजगी स्टार्टअपमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर निरीक्षक म्हणून सामील झाले आहेत.
- कामात खंड पडणार नाही: मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सोमनाथ आता या पदावर नसले तरी याचा गगनयान मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. अंतराळ मोहीम अविरत सुरू आहे.
- इस्रोची कार्यसंस्कृती: इस्रोमध्ये सर्व प्रकल्प निरंतर चालतात. १० वर्षांपूर्वी एका बैठकीत अंतराळात माणूस पाठवणे सोपे आहे पण त्याला सुरक्षित परत आणणे तितकेच आव्हानात्मक आहे, या चर्चेतून क्रू मॉड्यूलचे काम सुरू झाले होते. निवृत्त वैज्ञानिकही इस्रोच्या प्रकल्पांमध्ये आजही सक्रिय योगदान देतात.
कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील डेटा लीकचा दावा फेटाळला
तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील संवेदनशील माहिती किंवा डेटा लीक झाल्याच्या चर्चांवर केंद्रीय मंत्र्यांनी पूर्णविराम लावला आहे. एनपीसीआयएल (NPCIL) ने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, या धोरणात्मक आणि संवेदनशील प्रकल्पातून कोणताही डेटा चोरीला गेलेला नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडलेली नसताना या प्रकरणाच्या चौकशीची किंवा पुनरावलोकनाची कोणतीही आवश्यकता नाही, असे मंत्र्यांनी म्हटले आहे.
सध्या या प्रकरणाचा तांत्रिक तपास एनपीसीआयएल आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) संयुक्तपणे करत आहेत.










