Sonam Wangchuk : नीट पेपरफुटीबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गेले 18 दिवस उपोषण करत असलेले लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज तीव्र चिंता व्यक्त केली. वांगचूक यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून त्यांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार द्या, त्यांच्या प्रकृतीची सरकारी डॉक्टरांकडून दैनंदिन तपासणी करून घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिल्ली आणि केंद्र सरकारला दिले. मात्र, सरकारने या उपोषणाची दखल न घेतल्याने आजही वांगचुक यांनी उपोषण सुरुच ठेवल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले.
28 जूनपासून आमरण उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती वेगाने ढासळत चालली आहे. काल आंदोलनाच्या अठराव्या दिवशी त्यांचे वजन सुमारे 8.9 किलोने घटले होते. तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश कुमार सैनी यांनी काल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. वांगचूक यांनी जबरदस्तीने अन्न भरवण्याचे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिल्ली आणि केंद्र सरकाराला द्यावेत, अशी मागणी अॅड. सैनी यांनी केली होती.
तसेच विषयाचे गांभीर्य ओळखून याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही केली होती. त्यांची विनंती मान्य करत काल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने काल दिल्ली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून याचिकेवर आज नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज अॅड. सैनी यांच्या याचिकेवर नियमित सुनावणी झाली. त्याप्रसंगी केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. केंद्र सरकारच्या निर्देशांवरून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर सरकारी डॉक्टर देखरेख ठेवून आहेत. वांगचुक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काही उपचार देणे गरजेचे असतील ते सर्व उपचार केंद्र सरकार देईल. जीवन अमुल्य आहे आणि कोणाचाही जीव वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो, असे निवेदन मेहता यांनी खंडपीठासमोर केले.
मेहता यांच्या या निवेदनावर समाधान व्यक्त करून त्यांच्या प्रकृतीवर सरकारी डॉक्टरांकरवी दररोज देखरेख ठेवण्याचे आणि त्यांना आवश्यक ते सर्व औषधोपचार पुरवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
सध्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील चार ते पाच डॉक्टरांचे पथक, वांगचुक यांच्या रक्तदाब, रक्तातील साखर, वजन आणि इतर महत्त्वाच्या मापदंडांवर लक्ष ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोनदा उपोषण स्थळी भेट देत आहे. या पथकातील वरिष्ठ जनरल फिजिशियन डॉ. सतिश लांबा यांनी सांगितले की, वांगचुक यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 80, नाडीचे ठोके प्रति मिनिट 72 आणि रक्तदाब झोपलेल्या स्थितीत 105/61 व बसलेल्या स्थितीत 101/65 होता. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे आणि ते मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत. मात्र, वांगचुक यांचे शरीर ऊर्जेसाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करत असल्याने त्यांच्या युरिक अॅसिडची पातळी वाढत आहे आणि त्यांच्या लघवीमध्ये कीटोन्स आढळले आहेत. शरीराने साठवलेल्या कर्बोदकांऐवजी चरबी जाळण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे. वांगचुक यांचे मूत्रपिंड आतापर्यंत सामान्यपणे कार्य करत होते. परंतु दीर्घकाळ उपवास केल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
वांगचुक यांना जबरदस्तीने अन्न भरवण्याच्या बाबतीत डॉ. लांबा म्हणाले की, त्यासाठी आधी संमती आवश्यक असेल. जर वैद्यकीय हस्तक्षेप अपरिहार्य झाला, तर ट्यूब फीडिंगपेक्षा इंट्राव्हेनस सपोर्ट (ईलेक्ट्रोलाइट्ससह डेक्स्ट्रोज आणि सलाईनचे द्रावण देणे) हा अधिक सुरक्षित पर्याय असेल. कारण ट्यूब फीडिंगमध्ये अन्न श्वासनलिकेत जाणे किंवा इन्सुलिनची पातळी अचानक वाढणे यांसारखे धोके असतात.दरम्यान, वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आजही विविध क्षेत्रातील दिग्गज पुढे आले. काल कुणाल कामराने जंतरमंतरवर येऊन वांगचुक यांना पाठिंबा दिला. तर आज मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी आणि सरकारला संवेदनशीलतेचे आवाहन करण्यासाठी एक दिवसाचे प्रतिकात्मक उपोषण केले.
युवा भारताची काळजी नाही
आदित्य ठाकरे यांची टीका
सोनम यांच्या उपोषणावरून उबाठाचे नेते आमदार आदित्य यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून भाजपावर टीका केली. त्यांनी म्हटले की, सोनम वांगचुक ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या कारणाविषयी भाजपा सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरावे. त्यांना पदावरून हटवावे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारानंतरही इतके अकार्यक्षम केंद्रीय मंत्री कोणत्याही देशात पदावर राहिले नसते. पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा… भाजपाचे एकच धोरण आहे, लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची.
आदित्य ठाकरे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी 19 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क मैदानात आंदोलनही करणार आहेत.
मी उपोषण सोडल्याने काय
बदलेल? वांगचुक यांचा सवाल
कॉकरोच जनता पक्षाच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांनी उपोषण सोडावे यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानेही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. यावर वांगचुक यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, मी उपोषण सोडल्याने काय बदलणार? मी अन्न घेतल्याने आंदोलनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल का?’ सोनम वांगचुक म्हणाले की, मी उपोषण सोडावे आणि काहीतरी खावे, असे मला तुमच्याकडून हजारो संदेश येत आहेत. अनेक ज्येष्ठ राजकारणी माझ्याकडे येऊन प्रेमाने तसेच कधी रागानेही मला समजावत आहेत. काही जण तर मला खाण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. परंतु मी उपोषण सोडले तरी काय बदलणार आहे? कोणता संदेश जाईल? उत्तर देण्याची गरज नाही, हाच संदेश जाईल. माझी प्रकृती इतकी गंभीर नाही की दोन-चार दिवसांत माझा मृत्यू होईल. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, 18 दिवसांच्या उपोषणानंतरचे सर्व रिपोर्ट सामान्य आहेत. आज ईसीजीही काढण्यात आला. तोही व्यवस्थित आहे. मला अशक्तपणा जाणवत आहे, स्नायू कमजोर होत आहेत. मात्र माझे शरीर अजूनही साथ देत आहे. मला उपोषण सोडायला सांगण्याऐवजी 20 जुलै रोजी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, जेणेकरून सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचेल.
लडाखच्या हक्कांसाठी वांगचुकच्या
वडिलांनीही उपोषण केले होते
जंतरमंतरवरील आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासारखेच त्यांच्या वडिलांनीही 1980 च्या दशकात उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
1984 साली सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल यांनी लडाखमधील आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा यासाठी 6 दिवस उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः लेह येथे गेल्या होत्या. त्यांनी सोनम वांग्याल यांना फळांचा रस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी लडाखमधील समुदायांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण झालेच नाही. हीच मागणी आजही कायम असून, सोनम वांगचुक यांच्या सध्याच्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी ती एक आहे.










