LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून हे नवीन दर रविवार, 7 जूनपासून लागू झाले आहेत. यावेळी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रतिसिलिंडर 29 रुपयांची वाढ केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी 7 मार्च रोजी कंपन्यांनी गॅसच्या किमतीत थेट 60 रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आतच ग्राहकांना हा दुसरा मोठा झटका बसला आहे.
LPG Price Hike: प्रमुख शहरांमधील गॅसचे नवीन दर
या ताज्या दरवाढीनंतर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता खालीलप्रमाणे झाली आहे:
- दिल्ली: 942 रुपये
- मुंबई: 941.50 रुपये
- कोलकाता: 968 रुपये
- हैदराबाद: 994 रुपये
बेंगळुरूमध्ये मात्र ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून, तिथे जुनेच दर म्हणजेच 915.50 रुपये प्रतिसिलिंडर किंमत कायम आहे.
LPG Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्ध ठरले कारण
देशात अचानक झालेल्या या दरवाढीमागे जागतिक पातळीवरील घडामोडी कारणीभूत आहेत. जागतिक ऊर्जा बाजारातील ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीपैकी एक पंचमांश व्यापार याच मार्गावरून होतो.
त्यातच 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड अस्थिर झाल्या आहेत. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलचा दर प्रतिबॅरल 100 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. यामुळे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. मार्चमधील वाढीनंतरही कंपन्यांचा तोटा भरून निघाला नव्हता. या नव्या दरवाढीपूर्वी कंपन्यांना प्रत्येक सिलिंडरच्या विक्रीवर सुमारे 703 रुपयांचे नुकसान होत होते.
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीही महागले
केवळ स्वयंपाकाचा गॅसच नाही, तर इतर इंधनांच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत:
- पेट्रोल आणि डिझेल: मे महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण 7.50 रुपये प्रतिलिटरची वाढ झाली आहे.
- सीएनजी: सीएनजीच्या दरातही सुमारे 6 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
या दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना पेट्रोलवर सुमारे 11 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर 33.6 रुपये प्रतिलिटरचा तोटा सहन करावा लागत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात सरकारने ही महागाई स्वतः सोसून ग्राहकांना दिलासा दिला होता, जेणेकरून बाजारात इतर वस्तूंचे भाव वाढणार नाहीत.
गॅसच्या मागणीत घट का झाली?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी एका बैठकीत सांगितले की, देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी घरगुती उत्पादन वाढवणे आणि आयातीची सुरक्षा सुनिश्चित करणे यावर सरकार काम करत आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारी कंपन्यांचे नुकसान अजूनही 700 रुपयांच्या आसपास आहे.
त्यांनी अलीकडच्या काळात एलपीजीच्या मागणीत झालेली घट स्पष्ट करताना 3 मुख्य कारणे सांगितली:
- गॅस डिलिव्हरीच्या वेळी सुरू केलेली अत्याधुनिक पडताळणी कोड (DAC) पद्धत.
- व्यावसायिक आणि औद्योगिक वापरकर्त्यांकडून गॅसचा वापर कमी झाला आहे.
- गॅस बुकिंगच्या कालावधीचे (25 दिवस आणि 45 दिवस) केलेले उत्तम व्यवस्थापन.










