Mumbai Accident Marine Drive : दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे रक्ताचा सडा पडला. अतिवेगामुळे झालेल्या एका भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या प्राणास मुकावे लागले असून, त्यांना धडक देणाऱ्या दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी पावणेसहाच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) आले होते. त्याच वेळी रस्त्यावरून दोन मोटारसायकल अत्यंत वेगाने जात होत्या. या भरधाव दुचाकींनी रस्त्यावरील त्या ज्येष्ठ व्यक्तीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तरुण आणि तरुणी देखील रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही मोटारसायकलचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने तिघेही गंभीर जखमी झाले आणि जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.
दुचाकींचा चक्काचूर आणि पोलिसांची कारवाई
अपघाताची भीषणता यावरून स्पष्ट होते की, धडकेनंतर दोन्ही दुचाकींची चाके, सायलेन्सर आणि चेसिसचे भाग अक्षरशः निखळून बाजूला पडले होते. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या तिघांचीही प्राणज्योत मालवली. पोलीस सध्या मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
रेसिंगचा संशय आणि पोलिसांचा तपास
प्राथमिक अंदाजानुसार, दुचाकीस्वार तरुण-तरुणी ‘नाईट आऊट’ संपवून घराकडे परतत असावेत. दोन्ही दुचाकी एकमेकांच्या अत्यंत जवळ होत्या आणि त्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे या बाईकस्वारांमध्ये कोणतीही जीवघेणी स्पर्धा (रेस) सुरू होती का, या दिशेने मरीन ड्राईव्ह पोलीस आता तपास करत आहेत. पहाटेच्या वेळी रस्त्यावरील मोकळ्या वातावरणाचा फायदा घेत वेगाची मर्यादा ओलांडणे या तिघांच्या जीवावर बेतले आहे.










