NEET Exam 2026 : देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) ही परीक्षा केंद्र सरकारने अधिकृतपणे रद्द केली आहे. ३ मे २०२६ रोजी पार पडलेली ही परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकारामुळे रद्द करण्यात आली असून, आता ही परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला असून, तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक ते हरियाणा: असा पसरला पेपरफुटीचा विळखा
तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालानुसार, या घोटाळ्याचे केंद्रस्थान महाराष्ट्र आणि हरियाणा असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. तिथून ही प्रत हरियाणाला पाठवण्यात आली, जिथे तिचे १० वेगवेगळे संच (Sets) तयार करण्यात आले. हरियाणातूनच ही प्रश्नपत्रिका बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या राज्यांमध्ये पसरवण्यात आली. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, राजस्थान पोलीस आणि इतर तपास यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत आहेत.
मनीष हा मुख्य सूत्रधार; १३ जणांची सीबीआय चौकशी
जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला मनीष हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. प्रश्नपत्रिका छपाईसाठी जाण्यापूर्वीच संभाव्य प्रश्न मिळवण्यात तो यशस्वी झाला होता, असा संशय आहे. ३ मे रोजी परीक्षा सुरू असतानाच पेपर फुटल्याचे मानले जात आहे. सध्या राजस्थानच्या विशेष कृती दलाच्या (SOG) ताब्यात असलेल्या १३ आरोपींची आता सीबीआय चौकशी करणार आहे. यामुळे या आंतरराज्य रॅकेटमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेरपरीक्षेचे नियम आणि विद्यार्थ्यांची स्थिती-
परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील सुमारे २२ लाख आणि महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
परीक्षा केंद्र: विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी ज्या केंद्रावर परीक्षा दिली होती, तिथेच त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल.
नोंदणी: फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी (Registration) करण्याची आवश्यकता भासणार नाही.
परीक्षा शुल्क: विद्यार्थ्यांकडून या फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
देशभरात संतापाची लाट-
नुकताच १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना या पेपरफुटीमुळे मोठा तडा गेला आहे. परीक्षेच्या ४२ तास आधीच पेपर बाहेर आल्याने शैक्षणिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










