Home / देश-विदेश / NEET Exam Leak : NEET पेपरफुटीत लातूर हादरले! मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात!

NEET Exam Leak : NEET पेपरफुटीत लातूर हादरले! मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात!

NEET Exam Leak : देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचला असून, केंद्रीय अन्वेषण...

By: Team Navakal
NEET Paper Leak:
Social + WhatsApp CTA

NEET Exam Leak : देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचला असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या पथकाने चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. लातूर आणि पुणे येथे झालेल्या सखोल तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे महाराष्ट्रातील खाजगी कोचिंग क्लासेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सीबीआयचे पथक मोटेगावकर यांची चौकशी करत होते. काल त्यांची तब्बल ११ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकरणाची पाळेमुळे शोधताना लातूरमधीलच प्राध्यापक एस. पी. कुलकर्णी यांचे नाव ‘मास्टरमाईंड’ म्हणून समोर आले होते. त्यानंतर सीबीआयने आपला तपासाचा मोर्चा नामवंत क्लास संचालकांकडे वळवला. मोटेगावकर यांच्या क्लासच्या शाखा केवळ लातूरच नव्हे, तर राज्यभर पसरलेल्या आहेत. या पेपरफुटीच्या गैरप्रकारात त्यांच्या क्लासेसचा काही थेट संबंध आहे का, किंवा यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध सीबीआय घेत आहे. विशेषतः या प्रकरणाचे ‘नांदेड कनेक्शन’ उघडकीस आल्याने तपासाची व्याप्ती अधिकच वाढली आहे. काल दिवसभर चाललेल्या चौकशीत नेमके काय धागेदोरे हाती लागले, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले नसले तरी, मोटेगावकरांना ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणातील गंभीर माहिती सीबीआयच्या हाती लागल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे, या कारवाईचे पडसाद शेजारील नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. लातूरमधील या हायप्रोफाईल चौकशीची बातमी पसरताच नांदेडमधील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे क्लासेसला आलेल्या विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी जाहीर करून घरी पाठवण्यात आले. “आजपासून सुट्ट्या लागल्या आहेत” असे अजब कारण देत अनेक मोठ्या क्लासेसनी आपली मुख्य कार्यालये बंद केली आणि शटरला कुलूप लावले. अचानक मिळालेल्या या सुट्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, सीबीआयच्या चौकशीच्या धसक्यानेच क्लासेस चालकांनी पळ काढल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या