Home / देश-विदेश / NEET-UG Crisis : नीटच्या पेपरचा थेट ५ लाखांत झाला होता सौदा, मोटेगावकरच्या मोबाईलने उघड केले धक्कादायक गुपित; सीबीआयच्या तपासात केमिस्ट्रीचे तब्बल १३२ प्रश्न सापडल्याने देशभरात खळबळ…

NEET-UG Crisis : नीटच्या पेपरचा थेट ५ लाखांत झाला होता सौदा, मोटेगावकरच्या मोबाईलने उघड केले धक्कादायक गुपित; सीबीआयच्या तपासात केमिस्ट्रीचे तब्बल १३२ प्रश्न सापडल्याने देशभरात खळबळ…

NEET-UG Crisis : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यामुळे आधीच राज्यासह देशाचे राजकारण कमालीचे तापले आहे....

By: Team Navakal
NEET-UG Crisis
Social + WhatsApp CTA

NEET-UG Crisis : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यामुळे आधीच राज्यासह देशाचे राजकारण कमालीचे तापले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीत आमरण उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावत असल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. याच गदारोळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासाचा धडाका लावला असून, महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमधून अनेक संशयितांना अटक केली आहे. आता या तपासातून पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार (Mastermind) पी.व्ही. कुलकर्णी आणि लातूरमधील नामांकित कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे.

फोनमध्ये होत्या ३६ इमेज; १३२ पैकी १११ प्रश्न थेट परीक्षेत आले!
सीबीआयने केलेल्या सखोल तांत्रिक आणि डिजिटल तपासात शिवराज मोटेगावकरच्या मोबाईल फोनमधून अत्यंत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. मोटेगावकर याने नीट परीक्षेतील केवळ केमिस्ट्री (रसायनशास्त्र) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी पी.व्ही. कुलकर्णी यांना ५ लाख रुपये रोख दिल्याची कबुलीवजा माहिती समोर आली आहे. सीबीआयला मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेच्या तब्बल ३६ इमेज (छायाचित्रे) सापडल्या आहेत. या इमेजमध्ये एकूण १३२ प्रश्न होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, परीक्षेपूर्वीच मिळालेल्या या १३२ प्रश्नांपैकी तब्बल १११ प्रश्न जसेच्या तसे प्रत्यक्ष नीटच्या मुख्य परीक्षेत आले होते, अशी खात्रीशीर माहिती सीबीआयच्या तपासातून उघड झाली आहे. यामुळे हे पेपरफुटीचे रॅकेट किती अचूक आणि खोलवर पसरले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बँक खाती आणि लॉकरची तपासणी; कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांचा संशय
या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटला आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांची (Money Laundering) जोड मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या विशेष पथकाने मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या विविध बँकांमधील खाती आणि लॉकरची पडताळणी सुरू केली आहे. या बँक लॉकरच्या झडतीदरम्यान मोठी रोकड, बेकायदेशीर मालमत्ता खरेदीची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि संशयास्पद बँक व्यवहारांच्या नोंदी हाती लागण्याची दाट शक्यता आहे. या कोट्यवधींच्या व्यवहारांची पाळेमुळे शोधण्यासाठी सीबीआय बँकिंग तज्ज्ञांची मदत घेत आहे.

शेतकरी कुटुंबातील मुलगा ते १०० कोटींच्या क्लासचा मालक: शिवराज मोटेगावकर कोण?
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या केंद्रस्थानी आलेला आणि लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात अत्यंत वजनदार नाव असलेला शिवराज मोटेगावकर हा मूळचा लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो उच्च शिक्षणासाठी लातूरला आपल्या मोठ्या बहिणीकडे आला होता. तेथून त्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत (नांदेड) एम.एस्सी. (केमिस्ट्री) ही पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने लातूरच्या गल्लोगल्ली जाऊन विद्यार्थ्यांच्या ‘होम ट्युशन्स’ घेण्यास सुरुवात केली होती.

कठोर परिश्रम आणि व्यावसायिक हुशारीच्या जोरावर सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला त्याचा क्लास पुढे वेगाने विस्तारला. पुढे त्याने ‘आरसीसी’ (RCC) या नामांकित क्लासेसची स्थापना केली. पाहता पाहता या क्लासेसचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात झाला आणि आज या क्लासेसची वार्षिक आर्थिक उलाढाल जवळपास १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या