Home / देश-विदेश / NEET UG 2026 Re-exam: नीट पुनर्रिक्षेसाठी आज देशभरात रंगीत तालीम! 5 हजार केंद्रांवर 3 स्तरांची सुरक्षा, परीक्षा यंत्रणा हायअलर्टवर

NEET UG 2026 Re-exam: नीट पुनर्रिक्षेसाठी आज देशभरात रंगीत तालीम! 5 हजार केंद्रांवर 3 स्तरांची सुरक्षा, परीक्षा यंत्रणा हायअलर्टवर

NEET UG 2026 Re-exam: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीए द्वारे २१ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या नीट पुनर्रिक्षेसाठी देशभरात जय्यत तयारी...

By: Team Navakal
NEET UG 2026 Re-exam: नीट पुनर्रिक्षेसाठी आज देशभरात रंगीत तालीम! 5 हजार केंद्रांवर 3 स्तरांची सुरक्षा, परीक्षा यंत्रणा हायअलर्टवर
Social + WhatsApp CTA

NEET UG 2026 Re-exam: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीए द्वारे २१ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या नीट पुनर्रिक्षेसाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि पूर्ण सुरक्षेत पार पाडण्यासाठी आज सकाळी ९ वाजेपासून ते थेट रात्रीपर्यंत संपूर्ण देशात एक मोठी तालीम आयोजित करण्यात आली आहे.

या सराव मोहिमेमध्ये देशभरातून सुमारे २.५ लाख सुरक्षा जवान सहभागी होत आहेत. परीक्षा केंद्रांची संपूर्ण जबाबदारी आता एनटीएकडे सोपवण्यात आली असून सुरक्षेतील त्रुटी तपासण्यासाठी ही तालीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

परीक्षा केंद्रांवर ३ स्तरांची सुरक्षा; ५ हजार केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना कोणत्याही गैरप्रकाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत:

  • सर्व परीक्षा केंद्रांवर ३ स्तरांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असेल.
  • प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची वाहतूक तसेच सुरक्षेची मुख्य जबाबदारी निमलष्करी दलाकडे सोपवली आहे.
  • देशातील ५,००० पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट लक्ष ठेवले जाईल.

सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडिओ बनावट; एनटीएचे स्पष्टीकरण

सध्या सोशल मीडियावर नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचा खुलासा एनटीएने केला आहे.

अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पाकिटात आवश्यक असणारी ओएमआर उत्तरपत्रिका नाही, जी मूळ परीक्षा पुस्तिकेसोबत दिली जाते. या व्हिडिओमध्ये अनेक विसंगती असून विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या रद्द; एनएमसीचे कडक आदेश

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना हायअलर्ट जारी केला आहे. २0 जून आणि २१ जून रोजी अत्यंत आपत्कालीन परिस्थिती वगळता कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा कर्मचाऱ्याला सुट्टी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टेलिग्रामवरील तात्पुरत्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाची मंजुरी

परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्रामवर घातलेली तात्पुरती बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९A अंतर्गत सरकारने घेतलेला हा निर्णय परीक्षेची गोपनीयता टिकवण्यासाठी गरजेचा होता, असे म्हणत न्यायालयाने टेलिग्रामची याचिका फेटाळून लावली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या