Thalapathy Vijay TVK Win : तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात २०२६ हे वर्ष एका नव्या पर्वाच्या सुरुवातीचे साक्षीदार ठरले आहे. अभिनयातून संन्यास घेऊन राजकारणात प्रवेश करणाऱ्या थलपती विजय याच्या ‘तमिलगा वेट्टी कड़गम’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये विजयच्या पक्षाने प्रस्थापित राजकीय शक्तींना धक्का देत स्पष्ट बहुमत मिळवले. पहिल्याच निवडणुकीत थलपती विजयने मिळवलेल्या या ‘लँडस्लाइड’ विजयाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
जोफ्रा आर्चरचे ‘ते’ ट्वीट आणि भविष्यातील भाकीत?
विजयच्या या ऐतिहासिक विजयाची चर्चा होत असतानाच, सोशल मीडियावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे ११ वर्षांपूर्वीचे एक जुने ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. आर्चरने २५ एप्रिल २०१५ रोजी केवळ “Vijay wtf” असे छोटेसे ट्वीट केले होते. आता थलपती विजयच्या विजयानंतर नेटकऱ्यांनी हे ट्वीट उकरून काढले असून, “जोफ्रा आर्चरला भविष्यात काय घडणार आहे हे आधीच ठाऊक असते,” अशा भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जोफ्राने जणू १०-११ वर्षांपूर्वीच विजयच्या या राजकीय वादळाची पूर्वसूचना दिली होती, असा दावा गमतीने केला जात आहे.
Vijay wtf
— Jofra Archer (@JofraArcher) April 25, 2015
ट्वीटमागील खरे वास्तव: क्रिकेटचा संदर्भ
नेटकरी जरी या ट्वीटचा संबंध थलपती विजयच्या राजकीय यशाशी जोडत असले, तरी यामागील वास्तव पूर्णतः वेगळे आहे. २०१५ मध्ये आर्चरने हे ट्वीट दाक्षिणात्य सुपरस्टारसाठी नव्हे, तर क्रिकेटपटू मुरली विजय याच्यासाठी केले होते. त्यावेळी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगला होता. पंजाबकडून खेळणाऱ्या मुरली विजयने १९३ धावांचा पाठलाग करताना अत्यंत संथ फलंदाजी केली होती. त्याने ३२ चेंडूंत केवळ ३४ धावा केल्या होत्या, ज्यावर नाराजी व्यक्त करण्यासाठी आर्चरने ते ट्वीट केले होते. विशेष म्हणजे, ज्यावेळी आर्चरने हे ट्वीट केले होते, तेव्हा तो स्वतः आयपीएलचा भाग नव्हता.
आर्चर आणि ‘भविष्यवाणी’चा योगायोग
जोफ्रा आर्चरचे जुने ट्वीट्स आणि वर्तमानकाळातील घटना यांचा संबंध जोडला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक जागतिक घटनांबाबत आर्चरची जुनी विधाने तंतोतंत लागू पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच थलपती विजयच्या विजयानंतर पुन्हा एकदा आर्चरच्या ‘भविष्यवाणी’ची चर्चा रंगली आहे.
तामिळनाडूत थलपती विजयवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पक्षाने मिळवलेले हे यश राज्यातील राजकारणाला नवी दिशा देणारे ठरेल, अशी चिन्हे आहेत. एका बाजूला राजकीय विजयाचा जल्लोष आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील हा रंजक योगायोग, अशा दुहेरी कारणांमुळे सध्या ‘थलपती विजय’ हे नाव जगभरात चर्चेत आहे.










