Pune Crime Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरतम शिक्षा मिळवून देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आता युद्धपातळीवर तपास चक्रं फिरवत आहेत. पुराव्यांची साखळी मजबूत करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे तपास मोहीम राबवली.
तपासासाठी गुन्ह्याचे ‘री-क्रिएशन’
जनमानसातील तीव्र संताप आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला मंगळवारी मध्यरात्री घटनास्थळी नेले. भरदिवसा आरोपीला नेणे धोक्याचे ठरू शकले असते, त्यामुळे पोलिसांनी कोणालाही सुगावा लागू न देता मध्यरात्री ही कारवाई केली. यावेळी आरोपीने पीडित मुलगी कुठे खेळत होती, तिला कोणत्या मार्गाने गोठ्यात नेले आणि गुन्ह्याची अंमलबजावणी कशी केली, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Re-creation) पोलिसांना दाखवले. ही सर्व माहिती पोलिसांनी आरोपपत्रात (Charge sheet) अधिकृत पुरावा म्हणून नोंदवली आहे.
शवविच्छेदन अहवालातील अंगावर काटा आणणारे वास्तव
पीडित मुलगी उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजीकडे आली होती, मात्र १ मे रोजी नराधमाने तिचे आयुष्य संपवले. ससून रुग्णालयाने सादर केलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात या गुन्ह्यातील क्रूरतेची परिसीमा दिसून आली आहे. आरोपीने मुलीचा आवाज दाबण्यासाठी तिच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केला. विशेष म्हणजे, अत्याचारानंतर मुलगी मृत झाली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी त्याने तिच्या छातीवर जोरदार प्रहार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी या सर्व बाबींची ‘इन-कॅमेरा’ तपासणी करून अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष
न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत पोलीस आतापर्यंतच्या तपासातील नवे आणि महत्त्वाचे धागेदोरे न्यायालयासमोर मांडणार आहेत. गुन्ह्यातील क्रूरता आणि तांत्रिक पुरावे पाहता, पोलीस आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. राज्यभरातून या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्याला संतप्त जनसमुदायाच्या स्वाधीन करावे, अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.










