BJP Victorious : पाच राज्यांच्या निवडणुकांचा अपेक्षित निकाल आज लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवत ऐतिहासिक कामागिरी नोंदवली. ममता यांनी 15 वर्षांपूर्वी डाव्यांना पराभूत करत त्यांची 35 वर्षांची राजवट संपवत बंगालमधून हद्दपार केले होते. त्याच पद्धतीने आज भाजपाने पश्चिम बंगालमध्ये दोन तृतियांश जागा जिंकत तृणमूलचा दारूण पराभव केला. भवानीपूर मतदारसंघातून ममता स्वत:ही पराभूत झाल्या. तामिळनाडूत पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सिनेअभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुकच्या स्टॅलिन यांना पराभूत केले. आसाममध्ये भाजपाचे हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसला चारी मुंड्या चीत करत सत्ता राखली. तर केरळात काँग्रेस आघाडीने डाव्या आघाडीवर मात करत त्यांची राजवट असलेल्या शेवटच्या राज्यातून सत्तेबाहेर फेकले. यानंतर भाजपाने मोठा जल्लोष केला.
या निवडणुकांनी मोदी यांच्या विरोधात खंबीर भूमिका घेणार्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. महाआघाडी करणारे नितिश कुमार यांना भाजपाने आपल्याकडे ओढले आणि लालूप्रसाद यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला, महाराष्ट्रात शिवसेना फोडून ठाकरेंची ताकद कमी केली, ओरिसात नवीन पटनाईक यांना सत्तेवरून खेचले, दिल्लीत ‘आप’ला फोडून केजरीवाल यांना जेरीस आणले. आता पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ची सत्ता घालवण्याची तयारी सुरू आहे, कर्नाटकात कधीही काँग्रेस फुटेल अशी स्थिती आहे. भाजपाला फक्त दक्षिणेत प्रवेश पूर्ण मिळालेला नाही, पण आता तामिळनाडूत विजय यांना बरोबर घेण्याची चाल भाजपा खेळेल. या सगळ्यात काँग्रेस अत्यंत अपयशी ठरला आहे. पश्चिम बंगालमधील विजयासोबत भाजपा किंवा भाजपा आघाडीने आता देशातील 22 राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली असून, भाजपाची सत्ता नसलेली मोजकीच राज्य आता उरली आहेत.
ममतांची 15 वर्षांची राजवट संपुष्टात
भाजपाची बंगालमध्ये पहिल्यांदा सत्ता
आज सकाळी 8 वाजता पाचही राज्यांत मतमोजणी सुरू झाली. बंगालमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आघाडी घेतली. तासाभरातील कलानंतरच दोन्ही पक्षांच्या जागांमधील फरक वाढत गेला आणि भाजपा बहुमताकडे जात असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत सगळ्या जागांचे कल हाती आले, तेव्हा भाजपा आणि तृणमूल यांच्यात 100 हून जागांचा फरक होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत येणार हे दिसताच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नाचू लागले आणि ‘जय श्री राम’ च्या घोषणा देऊ लागले. मिष्टी दोई आणि झालमुरी (भेळ)चे वाटप सुरू झाले. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगालचा दौरा केला होता, तेव्हा एका दुकानात झालमुरी खाल्ली होती. तीच वाटून भाजपा कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते. तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांत निराशा होती. आसनमोल आणि बैरतपूर येथे भाजपा आणि तृणमूल कार्यकर्ते आमनेसामने आले. तृणमूलच्या कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्याला आग लावल्याचा आरोप तृणमूल कार्यकर्त्यांनी केला.
2011 मध्ये डाव्यांना सत्तेतून बाहेर काढून ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सलग तीन वेळा राज्याच्या निवडणुका जिंकल्या होत्या. यावेळी भाजपाने ममता यांना कुठल्याही परिस्थितीत सत्तेबाहेर काढण्याचा चंग बांधला होता. याची तयारी भाजपाने खूप आधीपासून केली. त्यांनी हळूहळू पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या विरोधात वातावरण तयार केले. त्यानंतर पद्धतशीर प्रचार सुरू केला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारसभा घेतल्या. एकट्या अमित शहा यांनी 30 जाहीर सभा घेतल्या. 12 रोड शो केले.
भाजपाने ममता यांच्या राजवटीतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि तृणमूल कार्यकर्त्यांची कथित गुंडगिरी हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनवले. ते जनतेपर्यंत जोरदारपणे पोहोचवले.कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर भाजपाने ममता बॅनर्जी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह उभे केले. अनेक दिवस हा मुद्दा लावून धरला. निवडणुकीत आर. जी. कार पीडितेच्या आईला उमेदवारीही दिली. या निवडणुकीत भाजपाने ममतांचा भ्रष्टाचार हाही एक प्रमुख मुद्दा होता. शिक्षक भरती घोटाळ्यावरून त्यांना घेरले. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा जरी स्वच्छ असली, तरी त्यांच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तृणमूलची निवडणूक प्रचार संस्था असलेल्या आयपॅकवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बंगालमधील एसआयआर प्रक्रिया सर्वाधिक वादग्रस्त ठरली.
एसआयआरमधील कथित अनियमिततेविरोधात युक्तिवाद करण्यासाठी ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयातही गेल्या होत्या. राज्यात मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत मतदारांची नावे जोडली आणि वगळली जात होती. एसआयआर दरम्यान, 90 लाखांहून अधिक लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघ होते, जिथे लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली. याचा फटका ममता यांना बसला. यावेळी पश्चिम बंगालमध्ये एकूण सरासरी मतदान 92.93 टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तो देशातील कोणत्याही राज्यातील मतदानाचा एक नवीन विक्रम ठरला. या मतदानानेही समीकरण बदलल्याचे बोलले जात आहे. भाजपाने पश्चिम बंगालसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी 3,000 रुपये मासिक भत्ता, बेरोजगार तरुणांसाठी 3,000 रुपये भत्ता देण्याची घोषणा केली. गर्भवती महिलांना 21,000 रुपये आणि सहा पोषण किट आणि राज्य परिवहन बसमधून सर्व महिलांना मोफत प्रवास देण्याचेही आश्वासन दिले. भारताच्या या रणनीतीने ममता यांचा पराभव निश्चित केला.
मतमोजणीचे चित्र स्पष्ट होऊनही ममता पराभव मान्य करायला तयार नव्हत्या. दुपारी त्या भवानीपूर मतमोजणी केंद्रात गेल्या होत्या. साडेचार तासानंतर तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी बरीचे आगपाखड केली. त्यांनी आरोप केला की, भाजपाने आमच्या 100 जागा चोरल्या. निवडणूक आयोग भाजपाचा एजंट असल्यासारखा काम करत आहे. मतदान केंद्रांत मला मारहाण झाली. माझे केस खेचले, मला लाथ मारली. सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते. आमच्या एजंटलाही घुसून दिले नाही.
तर भाजपाचे सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ममतांना बंगालच्या हिंदू जनतेने नाकारलेले आहे. धडा शिकवला आहे. आता त्यांना त्यांचे रडगाणे रडू द्या.
पश्चिम बंगालमध्ये नवीन सूर्योदय झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी संध्याकाळी नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. या कार्यकर्त्यांनी आज नवीन इतिहास रचला. नितिन नवीन भाजपा अध्यक्ष झाल्यानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने आता घवघवीत यश मिळवले आहे. 5 राज्यांतील लोकांनी लोकशाही काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे. भाजपावर लोकांचा विश्वास आणखी वाढत चालला आहे. हा विजय पश्चिम बंगालच्या लोकांना समर्पित करत आहे. पश्चिम बंगालमध्ये नवीन सूर्योदय झाला आहे. बंगालच्या विकासासाठी भाजपा दिवसरात्र एक करणार आहे. महिलांच्या सुरक्षेची आणि तरुणांना रोजगार देण्याचीदेखील हमी देणार आहे. राजकीय हिंसेमुळे पश्चिम बंगालमधील लोकांचे मोठे नुकसान झाले. येथे आता बदला नाही, बदलाव होणार आहे. लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत.
बाबरी मशीदवाले हुमायून
दोन ठिकाणी विजयी
पश्चिम बंगालमध्ये अयोध्येसारखी बाबरी मशीद बांधायला निघालेले आणि त्यामुळे देशभरात चर्चेत आलेले हुमायून कबीर यांनी ते लढवत असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये बाजी मारली आहे. नौदा मतदारसंघात ते सुमारे 25 हजार मतांच्या फरकाने तर रेजिनगर मतदारसंघात 50 हजारहून अधिकच्या फरकाने विजयी झाले. बाबरी मशीद बांधण्याच्या त्यांच्या संकल्पामुळे त्यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर हुमायून कबीर यांनी आम जनता उन्नयन पार्टी हा आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षातून त्यांनी दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवली.
विजय यांची अनपेक्षित मुसंडी
द्रमुकचा लाजिरवाणा पराभव
तामिळनाडूत मोठी उलथापालथ होत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले. स्वतः स्टॅलिन यांचा एका मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला. तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तामिळ सुपरस्टार विजय थलापती यांच्या तमिलगा वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने अनपेक्षितपणे घवघवीत यश मिळवले. 105 जागा जिंकणारा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. स्टॅलिन यांचा द्रमुक तिसर्या स्थानी फेकला गेला. राज्यात 1967 नंतर पहिल्यांदाच पारंपरिक द्रविडी राजकारणाला फाटा देत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांव्यतिरिक्त तिसरा पक्ष सत्तेवर येणार आहे.
तामिळनाडूत 85 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्याचे रुपांतर प्रस्थापितविरोधी लाटेत झाल्याचे दिसून आले. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकताच टीव्हीकेने अण्णा द्रमुककडे जाण्याआधी काँग्रेसने टीव्हीकेसमोर पाठिंब्याचा प्रस्ताव ठेवला. निवडणुकीपूर्वी काँग्रेस इंडिया आघाडीत द्रमुकसोबत होता. मात्र टीव्हीकेची वाढलेली ताकद पाहून काँग्रेस टीव्हीकेला बाहेरून किंवा थेट पाठिंबा द्यायला तयार झाला आहे. त्यामुळे नवे सत्तासमीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजय थलापती यांनी आपण भाजपासोबत जाणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात.
स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेऊन तमिळ अस्मितेच्या मुद्याला महत्त्व दिले होते. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावरून त्यांचे केंद्र सरकारशी खटके उडाले. केंद्र सरकारने तामिळनाडूचा निधीही अडवून ठेवला होता. परंतु आर्थिक कोंडी होऊनही स्टॅलिन यांनी आपली भूमिका बदलली नाही. मात्र तमिळ अस्मितेचा मुद्दा त्यांना मते मिळवण्यात झाला नाही. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात सापडले होते. सनातन उन्मुलन संमेलनात बोलताना उदयनिधी यांनी सनातन धर्माला आजार पसरवणार्या डासांची उपमा देत सनातन धर्माचा नायनाट करण्याची भाषा केली होती.
दुसर्या बाजूला अभिनेता विजयने कुठलीही हवा नसताना आश्चर्यकारक यश मिळवले. टीव्हीकेने शंभरी ओलांडताच विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी कार्यकर्ते आणि कुटुंबियांनी मोठा जल्लोष सुरू केला. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी वाजवत आनंद साजरा करताना दिसत आहेत. विजय याची दोन वर्षांतील राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. 2009 मध्ये विजय यांनी विजय मक्कल अय्यकम नावाने स्वतःचा फॅन क्लब सुरू केला. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत विजय यांनी अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2022 मध्ये त्यांच्या फॅन क्लबमधील सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवल्या. त्यांनी तब्बल 115 जागा जिंकल्या. 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी तमिलगा वेट्री कझगम (टीव्हीके) या राजकीय पक्षाची स्थापना केली, तेव्हाच त्यांनी चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारत पूर्ण वेळ राजकीय करिअर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरच्या तामिळनाडू विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत त्याने सत्तेपर्यंत पोहोचण्याचा चमत्कार केला.
विजय यांच्या ड्रायव्हरचा
मुलगा आमदार झाला
तामिळी सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या झंझावातामध्ये विजय यांचे दीर्घ काळापासून विश्वासू ड्रायव्हर राजेंद्रन यांचे पुत्र सबरिनाथन हे विरुगंबक्कम मतदारसंघातून विजयी झाले आहे. सबरिनाथन यांना टीव्हीकेने उमेदवारी जाहीर केली होती तेव्हा सबरिनाथन यांना मंचावरच अश्रू अनावर झाले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विजय यांनी एका सामान्य कर्मचार्याच्या मुलाला पक्षातून उमेदवारी देऊन विश्वास आणि निष्ठेचा संदेश दिला होता.
केरळमध्ये काँग्रेस आघाडी विजयी
डाव्यांची सत्ता देशातून हद्दपार
तिरुअनंतपूरम – केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (युडीएफ)ने स्पष्ट बहुमत मिळवत डाव्या पक्षांच्या आघाडीला (एलडीएफ) पराभूत केले. या निकालामुळे डाव्या पक्षांचा देशातील अखेरचा गडही कोसळला. तर सततच्या पराभवाच्या मालिकेत काँग्रेससाठी हा विजय दिलासा देणारा ठरला. एकही आमदार नसलेल्या भाजपाने प्रथमच केरळात खाते उघडत 2 जागांवर विजय मिळवला
केरळमध्ये गेली 10 वर्षे सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल असे भाकीत सर्वच एक्झिट पोलनी केले होते. मात्र, काँग्रेसप्रणित युडीएफने 100 हून अधिक जागा जिंकत सगळ्यांना चकीत केले. एलडीएफला अँटी-इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचे मानले जात आहे. तर डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश मिळाले. पश्चिम बंगालनंतर त्रिपुरानंतर केवळ केरळमध्येच डाव्यांची सत्ता होती. मात्र या निकालामुळे देशातील एकाही राज्यात डाव्यांची सत्ता उरली नाही. 49 वर्षांत पहिल्यांदाच देशात डावे सरकार नाही. स्वतः मुख्यमंत्री पिनराई विजयन आपल्या धर्मादाम मतदारसंघात बर्याच फेर्यांपर्यंत पिछाडीवर होते. शेवटच्या काही फेर्यांत त्यांनी आघाडी मिळवली. पिनरन यांचे मंत्री मंत्री ओ. आर. केलू यांचा पराभव झाला. तर एलडीएफचे महत्त्वाचे नेते जोस के. मणी पाला मतदारसंघात पराभूत झाले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री चंडी ओमन यांनी विजय मिळवला.
विजयाचा कल स्पष्ट होताच तिरुवनंतपूरम येथील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. युडीएफला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस वाढली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन, रमेश चेन्निथला आणि चांडी ओमान यांची नावे चर्चेत आहेत. या निकालानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, सत्ताधारी आघाडीतील काही मंत्री किंवा आमदार वैयक्तिक स्तरावर लोकप्रिय असले तरी, राज्यातील जनतेने एकूण कारभाराचा विचार करून मतदान केले. लोकांना विद्यमान परिस्थितीत बदल हवा होता आणि त्यांनी त्यासाठी निर्णायक मतदान केले. हा निकाल केवळ सत्तांतराचा संकेत नाही, तर मतदारांच्या परिपक्वतेचे द्योतक आहे.
आसामात तिसर्यांदा भाजपा
काँग्रेसची पुन्हा घसरण
दिसपूर – आसाममध्ये भाजपाने दोन तृतियांश जागा जिंकत सलग तिसर्यांदा सत्ता मिळवली. तर काँग्रेसची मागील निवडणुकीपेक्षाही घसरण झाली. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत 29 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना 21 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा जोरहाट मतदारसंघातून पराभव झाला. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. तर मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.
या निवडणुकीत ‘मामा’ आणि ‘मियां’ या दोन शब्दांची खूप चर्चा झाली होती. ‘मियां’ म्हणजे मुसलमानांच्या मुद्यावर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. बांगलादेशी घुसखोरी, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाजपाने हिंदू मतांचे ध्रुवीकरण साधले. तर सरमा यांनी ‘मामा’ अशी स्वतःची प्रतिमा उभी करत आपल्याला राज्यातील महिलांचा संरक्षक म्हणून सादर केले.
या विजयाचे प्रमुख शिल्पकार मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी भावनिक आणि सामाजिक पातळीवर प्रभावी रणनीती राबवली. ‘अरुणोदयी 2.0’सारख्या योजनांद्वारे लाखो महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत म्हणून जमा करण्यात आली. याशिवाय भाजपाने एजीपी आणि यूपीपीएलसारख्या स्थानिक पक्षांसोबत युती केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आसाममध्ये प्रचार केला. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिब्रूगड येथील चहाच्या मळ्याला भेट देत महिला कामगारांशी संवाद साधला. त्याची मोठी चर्चा झाली. काँग्रेसकडून राहुल गांधी आणि राज्यातील प्रमुख चेहरा गौरव गोगोई यांनी आक्रमक प्रचार केला. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसला नाही. एआययूडीएफसोबत प्रभावी आघाडी न झाल्याने मुस्लीम मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा
भाजपाला झाला.
गौरव गोगोई यांचा तब्बल
23 हजार मतांनी पराभव
आसाममध्ये काँग्रेसचा प्रमुख चेहरा मानले जाणारे गौरव गोगोई यांना जोरहाट मतदारसंघातून मोठा धक्का बसला आहे. त्यांचा तब्बल 23,182 मतांनी पराभव झाला. भाजपाचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
पुद्दुचेरीत पुन्हा एनडीए आघाडीचे सरकार
पुद्दुचेरी – पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा येणार आहे. या आघाडीत ऑल इंडिया एन.आर., काँग्रेस, भाजपा अण्णा द्रमूक आणि एल.जे.के. या पक्षांचा समावेश आहे. या आघाडीला 30 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस, द्रमुक, व्हीसीके आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांना 5 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीतही एनडीए आघाडीने 16 जागा जिंकल्या होत्या.










