Uddhav Thackeray Delhi Protest: दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्च्यादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात देशाच्या उज्ज्वल भविष्यावर आणि तरुणांवर लाठीचार्ज करणारे हे पहिलेच निर्दयी सरकार मी पाहत आहे. हा लढा केवळ एका शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलण्याचा आहे. जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत तरुणांच्या आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल होणार नाही.”
अभिजीत दिपकेचे कौतुक; ‘महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय याचा अभिमान’
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) सहकाऱ्यांचे आणि अभिजीत दिपके यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
- आंदोलनाची ठिणगी: अभिजीत दिपकेने लावलेली ही संघर्षाची ठिणगी आता संपूर्ण देशभरात पसरवायची आहे. महाराष्ट्र पूर्ण ताकदीने या तरुणांच्या पाठीशी उभा आहे.
- तरुणांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना टोला: आंदोलक तरुणांना हलक्यात घेणाऱ्या आणि त्यांना ‘कॉकरोच’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे मी आभार मानतो, कारण याच तरुण ताकदीने आता सरकारविरोधात युद्ध पुकारले आहे.
- पेपरफुटीमुळे होणाऱ्या आत्महत्या दुर्दैवी: स्वतंत्र भारतात परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे निष्पाप विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्राण गमावले त्यांचे स्मरण ठेवूनच हा लढा पुढे न्यावा लागेल.
“सध्याचे सत्ताधारी विसरलेत, देशाचे भविष्य माझ्यासमोर उभे आहे”
आंदोलक विद्यार्थ्यांच्या हिमतीचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जे लोक सत्तेच्या मधावर बसले आहेत, त्यांना हे समजत नाहीये की उद्या या देशाची धुरा सांभाळणारे तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्याच वयाच्या क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. ब्रिटिशांच्या काळात ज्याप्रमाणे देशप्रेमींना आतंकवादी म्हटले जायचे, तसाच प्रकार आज घडत आहे. आजच्या तरुणांना जे लोक आतंकवादी किंवा गुंड म्हणत आहेत, ते स्वतः परदेशातून आले आहेत की काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि गुंडांवर निशाणा साधत त्यांचा फोटो ‘वाँटेड’ म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजय राऊत यांच्या घरी उद्यापत्रकार परिषद
मुंबईत सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर उद्धव ठाकरे विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर, ते खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते दिल्लीतील पोलीस कारवाई आणि पेपरफुटी प्रकरणी पक्षाची पुढील सविस्तर भूमिका मांडणार आहेत.










