Home / क्रीडा / Sabestian Sawe : दोन तासांच्या आत ४२ किलोमीटर! केवळ ९६ ग्रॅमचे शूज घालून मॅरेथॉनवर राज्य करणारा ‘सुपरमॅन’ सेबॅस्टियन सावे!

Sabestian Sawe : दोन तासांच्या आत ४२ किलोमीटर! केवळ ९६ ग्रॅमचे शूज घालून मॅरेथॉनवर राज्य करणारा ‘सुपरमॅन’ सेबॅस्टियन सावे!

Sabestian Sawe : मानवी शरीर संरचनेच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत, ज्यामुळे माणूस चित्त्यासारखा वेग धारण करू शकत नाही, असे मानले...

By: Team Navakal
Sabestian Sawe 
Social + WhatsApp CTA

Sabestian Sawe : मानवी शरीर संरचनेच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत, ज्यामुळे माणूस चित्त्यासारखा वेग धारण करू शकत नाही, असे मानले जाते. मात्र, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या मर्यादांना छेद देता येतो, हे केनियाच्या ३१ वर्षीय सॅबेस्टियन सावे याने रविवारी सिद्ध केले. लंडन मॅरेथॉनमध्ये सावेने अवघ्या १ तास ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात ही शर्यत पूर्ण करत ऐतिहासिक जागतिक विक्रमाला गवसणी घातली. मॅरेथॉनचे अंतर दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच धावपटू ठरला असून, त्याच्या या कामगिरीने क्रीडा विश्व थक्क झाले आहे.

एकाच शर्यतीत दोन विश्वविक्रम; किप्टमची उणीव भासली
२०२३ मध्ये शिकागो मॅरेथॉनमध्ये केनियाच्याच केल्व्हिन किप्टमने २ तास ३५ सेकंदात शर्यत पूर्ण करून विक्रम नोंदवला होता. मात्र, यंदाच्या लंडन मॅरेथॉनमध्ये केवळ सावेनेच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या योमिफ केजेल्चा यानेही १ तास ५९ मिनिटे ४१ सेकंद अशी वेळ नोंदवत किप्टमचा विक्रम मोडीत काढला. दुर्दैवाची बाब म्हणजे, आपला विक्रम मोडीत निघालेला पाहण्यासाठी किप्टम आज जिवंत नाही. २०२४ च्या सुरुवातीला एका रस्ते अपघातात २४ वर्षीय किप्टमचा अकाली मृत्यू झाला होता. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सावेच्या या विक्रमाने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

तंत्रज्ञानाची जोड: ९६ ग्रॅमचे ‘सुपर शूज’ चर्चेत
सावेच्या या वेगामागे अदिदास कंपनीच्या ‘Adizero Adios Pro Evo 3’ या विशेष शूजचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. अवघ्या ९६ ग्रॅम वजनाचे हे शूज जगातील सर्वात हलके शूज मानले जातात. यामध्ये ‘लाईटस्ट्राईक प्रो इव्हो’ फोम आणि ‘एनर्जी ग्रिम’ ही प्रगत कार्बन तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात आली आहे. धावताना कमी ऊर्जा खर्च होऊन वेग वाढावा, या उद्देशाने हे शूज केवळ एका शर्यतीसाठी डिझाइन केले जातात. ५०० डॉलर्स (सुमारे ५० हजार रुपये) किंमत असलेले हे शूज सध्या तंत्रज्ञान प्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय ठरले आहेत.

कठोर सराव आणि नैसर्गिक आहाराचे गुपित
सावेच्या यशाचे खरे रहस्य केनियातील एल्डोरेट येथील उंचावरच्या प्रदेशात केलेल्या सरावात दडलेले आहे. समुद्रसपाटीपासून २८०० मीटर उंचीवर सराव केल्यामुळे त्याच्या रक्तातील लाल पेशींची क्षमता वाढली, ज्यामुळे फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो. दर आठवड्याला १८० ते २१० किलोमीटर धावणारा सावे ‘फाटलॅक’ (Fartlek) पद्धतीच्या सरावावर भर देतो. तसेच, त्याचा पारंपारिक केनियन आहार, ज्यामध्ये मक्याच्या पिठाचा ‘उगाली’ हा पदार्थ आणि ताजी फळे समाविष्ट असतात, त्याला दीर्घकाळ ऊर्जा पुरवण्यास मदत करतात.

अनवाणी प्रवासापासून जागतिक कीर्तीपर्यंत
रिफ्ट व्हॅलीमधील एका अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सॅबेस्टियन सावेचा प्रवास थक्क करणारा आहे. लहानपणी शाळेत जाण्यासाठी त्याला दररोज अनवाणी धावत जावे लागत असे. तीच धाव त्याच्या भविष्यातील विश्वविक्रमाची पायाभरणी ठरली. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्याने धावण्यालाच आपली जीवनसाधना बनवले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या