Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) मध्ये पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभवाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. गुरुवारी १६ एप्रिल रोजी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत केले. या सलग चौथ्या पराभवामुळे मुंबईच्या गोटात चिंतेचे ढग गडद झाले असून, कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पांड्याचे ‘कठीण निर्णय’ आणि आत्मचिंतनाची गरज
सामन्यानंतरच्या सादरीकरण सोहळ्यात कर्णधार हार्दिक पांड्याने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. तो म्हणाला की, “आता आम्हाला काही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. नेहमीच्याच पद्धतीने खेळत राहायचे की संघात काही मोठे आणि कठीण निर्णय घ्यायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” पांड्याने वैयक्तिक कामगिरीसोबतच सांघिक नियोजन आणि रणनीतीमधील त्रुटी मान्य केल्या. प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी स्वीकारून नव्याने सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्याने अधोरेखित केले, ज्यामुळे आगामी सामन्यांत संघात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
डी कॉकचे वादळी शतक ठरले निष्फळ
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठला होता. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ६० चेंडूंमध्ये नाबाद ११२ धावांची झंझावाती खेळी करत वानखेडेवर धावांचा पाऊस पाडला. त्याने नमन धीर (५० धावा) याच्यासह १२२ धावांची अभेद्य भागीदारी रचली, तर स्वतः पांड्याने २३ चेंडूंमध्ये ४१ धावांचे योगदान दिले. मात्र, पंजाबच्या अर्शदीप सिंगने अवघ्या २२ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली होती.
पंजाबचा सहज विजय आणि फलंदाजीचे प्रदर्शन
१९६ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूंमध्ये ६६ धावा कुटल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ६७ चेंडूंमध्ये १३९ धावांची विजयी भागीदारी रचत सामना १७ व्या षटकातच संपवला. मुंबईच्या अल्लाह गझनफरने दोन बळी मिळवले, परंतु इतर गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजीवर अंकुश ठेवता आला नाही.
सेहवागचा घाव: “ती रोहितची मुंबई होती, हार्दिकची नाही”
मुंबईच्या या पराभवावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अत्यंत टोकदार टिप्पणी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीका करताना सेहवाग म्हणाला, “इतिहास पाहिला तर मुंबई इंडियन्स सुरुवातीचे तीन-चार सामने हरल्यानंतरही जोरदार पुनरागमन करण्यासाठी ओळखली जायची. पण लक्षात ठेवा, ती रोहित शर्माची मुंबई होती, हार्दिक पांड्याची नाही.” पुनरागमन करण्याचे कसब आणि दबाव हाताळण्याची क्षमता यामध्ये हार्दिक सध्या कमी पडत असल्याचे सेहवागने सुचित केले. या विधानामुळे आता सोशल मीडियावर रोहित विरुद्ध हार्दिक असा नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











