Health Tips: मिठाई खाल्ल्याने कोणाला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हैद्राबादमध्ये एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय प्रकरण समोर आले आहे. येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने ५ ते ६ रसगुल्ले खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याचे हात-पाय निकामी झाले आणि त्याला तात्पुरता अर्धांगवायू झाला. तपासाअंती डॉक्टरांनी यामागील धक्कादायक वैद्यकीय कारण स्पष्ट केले आहे.
नेमकी घटना काय?
संबंधित तरुणाने ताजे रसगुल्ले खाल्ले होते, त्यामुळे हे प्रकरण अन्नातील विषबाधेचे नव्हते. मिठाई खाल्ल्यानंतर त्याला चारही अवयवांमध्ये प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला आणि तो हालचाल करण्यास अक्षम झाला.
धक्कादायक म्हणजे, गेल्या ६ महिन्यांत त्याच्यासोबत असे ३ वेळा घडले होते आणि प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ खाल्ल्यानंतरच हा त्रास झाला होता.
काय आहे ‘हायपोकेलेमिक पीरिऑडिक पॅरालिसिस’?
वैद्यकीय चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, त्या व्यक्तीच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी अत्यंत कमी झाली होती. डॉक्टरांच्या मते, हा ‘हायपोकेलेमिक पीरिऑडिक पॅरालिसिस’ नावाचा एक दुर्मिळ आजार आहे.
- इन्सुलिनचा परिणाम: काही लोकांमध्ये जास्त कर्बोदके किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात इन्सुलिनची पातळी अचानक वाढते.
- पोटॅशियमची कमतरता: वाढलेले इन्सुलिन रक्तातील पोटॅशियमला पेशींच्या आत ढकलते, ज्यामुळे रक्तातील पोटॅशियमची पातळी खालावते.
- स्नायूंचे कार्य थांबणे: पोटॅशियम कमी झाल्यामुळे स्नायू तात्पुरते काम करणे बंद करतात, परिणामी शरीराला अर्धांगवायूचा झटका येतो.
थायरॉईडशी संबंधित कनेक्शन
डॉक्टरांनी अधिक तपासणी केली असता, या तरुणाला थायरॉईडचा त्रास असल्याचे समोर आले. थायरॉईडच्या विकारामुळे अशा प्रकारचे झटके येण्याचा धोका अधिक वाढतो. असाच एक दुसरा प्रकार ३३ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत घडला होता, ज्याला जिलेबी आणि रबडी खाल्ल्यानंतर वारंवार असाच त्रास होत होता.
डॉक्टरांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, सामान्य लोकांसाठी मिठाई खाणे धोकादायक नाही. मात्र, जर जेवणानंतर वारंवार अशक्तपणा, पेटके येणे किंवा थकवा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो. विशेषतः थायरॉईडचा त्रास असलेल्या रुग्णांनी गोड पदार्थांच्या सेवनाबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा –











