Upcoming Electric Cars India: भारतीय ग्राहकांमध्ये सध्या इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची हीच पसंती लक्षात घेऊन मारुति सुजुकी, हुंडई आणि टाटा मोटर्स या देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या येत्या काही महिन्यांत आपली नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या गरजा असलेल्या ग्राहकांसाठी या गाड्या तयार करत आहेत. यामध्ये छोट्या आकाराच्या कॉम्पॅक्ट कारपासून ते मोठ्या 7-सीटर फॅमिली गाड्यांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. देशात येणाऱ्या या ३ शानदार इलेक्ट्रिक कार्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मारुति सुजुकी थ्री-रो इलेक्ट्रिक एमपीवी
मारुति सुजुकी भारतीय बाजारपेठेसाठी एका मोठ्या फॅमिली इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे:
- नवीन प्लॅटफॉर्म: ही नवीन थ्री-रोअसणारी गाडी कंपनीच्या आगामी ‘YMC’ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
- बॅटरी पॅक पर्याय: या मोठ्या कौटुंबिक गाडीमध्ये ग्राहकांना 49 kWh आणि 61 kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळू शकतात.
- संभाव्य किंमत आणि स्पर्धा: बाजारात लाँच झाल्यानंतर या गाडीची थेट स्पर्धा किआ कॅरेंस क्लेविस ईव्हीशी होईल. मारुति या कारची किंमत साधारणपणे 18 लाख ते 21 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्याची शक्यता आहे.
हुंडई कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही
हुंडई इंडिया आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यासाठी एका बजेट फ्रेंडली कारवर काम करत आहे:
१. बजेट सेगमेंट: ही कार सब-4 मीटर म्हणजेच 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या श्रेणीत येईल आणि किंमतीच्या बाबतीत क्रेटा इलेक्ट्रिकपेक्षा स्वस्त असेल.
२. दमदार रेंज: ही आगामी कार किआ सायरोस ईव्हीच्या प्लॅटफॉर्म आणि बॅटरीचा वापर करेल, अशी चर्चा आहे. ज्यामुळे ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमीपेक्षा जास्त अंतर पार करू शकेल.
३. सर्वात स्वस्त ईव्ही: ही गाडी भारतातील हुंडई कंपनीची आतापर्यंतची सर्वात परवडणारी म्हणजेच किफायतशीर इलेक्ट्रिक कार ठरू शकते.
टाटा सफारी ईव्ही
टाटा मोटर्सने आधीच पंच, नेक्सॉन, कर्व, हॅरियर आणि सिएरा यांसारख्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात सादर केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची लोकप्रिय कार सफारी देखील ईव्ही अवतारात येण्यासाठी सज्ज झाली आहे.
या प्रीमियम एसयूव्हीची भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरू झाली असून ती अनेकदा स्पॉट झाली आहे. सफारी ईव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर हॅरियर ईव्हीचे तंत्रज्ञान आणि बॅटरी पॅक वापरला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही प्रीमियम गाडी सिंगल चार्जमध्ये सुमारे 500 किमीच्या आसपास रेंज देईल, ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ती ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.










