Home / महाराष्ट्र / Beed News : मस्साजोग सरपंच पदासाठी चुरशीने मतदान; केंद्राबाहेर दोन गट भिडले, पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

Beed News : मस्साजोग सरपंच पदासाठी चुरशीने मतदान; केंद्राबाहेर दोन गट भिडले, पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज पोटनिवडणुकीची मतदान...

By: Team Navakal
Beed News
Social + WhatsApp CTA

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला असला, तरी दुपारच्या सुमारास राजकीय ईर्षेतून दोन गट समोरासमोर आल्याने मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

अफवा आणि पोलिसांची तत्परता
मतदान सुरू असतानाच केंद्रावरील ईव्हीएम (EVM) मशीन बंद पडल्याची अफवा परिसरात पसरली. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि काही काळ वातावरण तापले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मशीनमध्ये कोणताही बिघाड नसून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले. दोन गटांमधील शाब्दिक चढाओढ वाढण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही बाजूंना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मतदानातील अडथळा दूर केला.

अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख: थेट लढत
या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. अश्विनी देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “संतोष देशमुख यांनी गावाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांची अनेक स्वप्ने अद्याप अपूर्ण आहेत. गावकऱ्यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता आणि तोच विश्वास आज माझ्या पाठीशी उभा राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक सलोख्याचा वारसा
दुसरीकडे, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर गावाची बाजू सावरून धरली. “मस्साजोग हे गाव नेहमीच सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाते. येथे कोणत्याही प्रकारचे जातीय वाद किंवा कायमस्वरूपी तणाव नसतो. आजची घटना हा केवळ निवडणुकीचा क्षणिक आवेश होता. गावकऱ्यांनी अत्यंत शांततेत आणि लोकशाही मार्गाने या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
दिवसभर पार पडलेल्या या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर गावात निर्माण झालेली सहानभूती अश्विनी देशमुख यांच्या पथ्यावर पडते की स्वरूपानंद देशमुख बाजी मारतात, याचा फैसला उद्या होईल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या