Milk Adulteration: राज्यातील दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला जाणार आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (NDDB) यासाठी विशेष ‘टेस्ट स्ट्रिप’ तयार केली असली, तरी भविष्यात दुधातील भेसळ पूर्णपणे रोखण्यासाठी ‘एआय’ (Artificial Intelligence) आणि आयआयटीच्या मदतीने सक्षम यंत्रणा उभी करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा आढावा दिला. यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा आणि ग्राहकांना शुद्ध दूध मिळण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
Milk Adulteration: भेसळ रोखण्यासाठी नवी ‘टेस्ट स्ट्रिप’
राज्यात सध्या केवळ 40 टक्के दूध हे संघटित क्षेत्रातून येते, तर उर्वरित 60 टक्के असंघटित क्षेत्रातून येत असल्याने भेसळीचे मोठे आव्हान आहे. हे रोखण्यासाठी NDDB ने एक विशेष टेस्ट स्ट्रिप विकसित केली आहे. ही स्ट्रिप युरिया आणि इतर हानिकारक घटक त्वरित ओळखण्यास सक्षम असून, पुढील 6 महिन्यांत ती राज्यभर कार्यान्वित होईल. जास्तीत जास्त गावांना सहकारी व्यवस्थेशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Milk Adulteration: महानंद आणि आरे ब्रँडचे होणार ‘रिलाँचिंग’
राज्यातील ‘महानंद’ डेअरीच्या पुनरुज्जीवनाला वेग आला असून सुमारे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच ‘आरे’ आणि ‘महानंद’ या दोन्ही सरकारी ब्रँडचे नव्या स्वरूपात रिलाँचिंग केले जाणार आहे.
- नवे प्रकल्प: मुंबईत 3 लाख लिटर क्षमतेचा ‘ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प’ उभारला जाणार आहे.
- विस्तार: उदगीर येथे महानंदचा नवीन प्लांट आणि नागपूरमधील बुटीबोरी येथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- पर्यावरणपूरक पुढाकार: मुंबईतील आरे कॉलनीमध्ये कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पही सुरू केला जाणार आहे.
विदर्भ-मराठवाड्यात दुध संकलन वाढणार
विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये दूध संकलन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या एनपीडीडी (NPDD) योजनेतंर्गत महानंद डेअरीमध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आधीच सज्ज करण्यात आली आहे, अशी माहिती मीनेश शाह यांनी दिली.
हे देखील वाचा –











