FASTag Fraud Alert: जर तुम्ही तुमच्या वाहनासाठी फास्टॅगचा (FASTag) वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या महामार्गावरील प्रवाशांना लक्ष्य करून ‘फास्टॅग अॅन्युअल पास’च्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) एक सार्वजनिक सूचना जारी केली असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
असा होतोय हा डिजिटल स्कॅम
सायबर गुन्हेगार अधिकृत पोर्टलसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाईट तयार करून युजर्सना जाळ्यात ओढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या बनावट वेबसाईट्स गुगल सर्चमध्ये जाहिरातींच्या माध्यमातून सर्वात वर दिसतात. जेव्हा युजर या वेबसाईटवर जातो, तेव्हा त्याला मोबाईल नंबर, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि पेमेंटची माहिती भरण्यास सांगितली जाते.
युजरने पैसे भरले की, ते थेट स्कॅमर्सच्या खात्यात जमा होतात. अनेकदा युजर्सना कोणतेही कन्फर्मेशन मिळत नाही किंवा चक्क बनावट पावती दिली जाते.
गृह मंत्रालयानेही दिला इशारा
NHAI पूर्वी गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम विभागानेही अशा फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. हे स्कॅमर्स इतक्या सफाईदारपणे वेबसाईट डिझाइन करतात की, पहिल्या नजरेत खरी आणि खोटी वेबसाईट ओळखणे कठीण होते. डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून महामार्ग वापरकर्त्यांना लुटण्यासाठी हे सोफिस्टिकेटेड तंत्र वापरले जात आहे.
फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
NHAI ने वाहनधारकांसाठी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे:
- अधिकृत अॅपचा वापर: फास्टॅग अॅन्युअल पास किंवा इतर सेवांसाठी नेहमी ‘Rajmargyatra’ या अधिकृत अॅपचाच वापर करा.
- सर्च रिझल्टकडे लक्ष द्या: गुगलवर सर्च करताना येणाऱ्या ‘स्पॉन्सर्ड’ लिंक्स किंवा अनोळखी जाहिरातींवर क्लिक करणे टाळा.
- URL ची तपासणी: कोणतीही खाजगी माहिती किंवा पेमेंट डिटेल्स भरण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता (URL) नीट तपासा.
- माहिती शेअर करू नका: तुमचा ओटीपी (OTP), कार्ड डिटेल्स किंवा लॉगिन आयडी-पासवर्ड कोणालाही सांगू नका.
- संशयास्पद परवानग्या: जर एखादी वेबसाईट अनावश्यक परवानग्या मागत असेल किंवा संशयास्पद वाटत असेल, तर ती त्वरित बंद करा.
सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी सतर्कता हाच सर्वात मोठा उपाय आहे. कोणत्याही अनोळखी पोर्टलवर पैसे भरण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासणे प्रवाशांच्या हिताचे ठरेल.
हे देखील वाचा –











