Home / महाराष्ट्र / Eknath Khadse : “मला भाजप प्रवेशात आता रस नाही!”; गिरीश महाजनांच्या टोमण्यावर एकनाथ खडसेंचा जळजळीत पलटवार

Eknath Khadse : “मला भाजप प्रवेशात आता रस नाही!”; गिरीश महाजनांच्या टोमण्यावर एकनाथ खडसेंचा जळजळीत पलटवार

Eknath Khadse : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती....

By: Team Navakal
Eknath Khadse : "मला भाजप प्रवेशात आता रस नाही!"; गिरीश महाजनांच्या टोमण्यावर एकनाथ खडसेंचा जळजळीत पलटवार
Social + WhatsApp CTA

Eknath Khadse : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका जाहीर करत, आपल्याला भाजपमध्ये जाण्यात आता काडीचाही रस उरलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबतच खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी अधिकृतपणे सांगितले.

या निर्णयानंतर खडसे यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जुन्या आठवणी काढत जोरदार निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांनी नुकतेच खडसेंच्या दिल्लीतील संपर्कावरून मिश्किल टोमणा मारला होता, त्याला खडसेंनी व्हिडिओ प्रसिद्ध करत सडेतोड उत्तर दिले आहे.

“माझ्याच आग्रहामुळे महाजनांना १९९५ मध्ये तिकीट मिळाले” – खडसे

गिरीश महाजन यांनी स्वतःला ‘छोटा माणूस’ म्हटल्याचा समाचार घेताना एकनाथ खडसे यांनी भूतकाळातील अनेक राजकीय गुपिते उघड केली आहेत

एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे स्वतःला लहान म्हणत असले तरी ते थेट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे मोठे नेते आहेत. मात्र, 1995 च्या विधानसभा निवडणुकीत महाजनांना तिकीट मिळत नव्हते, ही गोष्ट ते विसरले आहेत. त्यावेळी मीच आग्रह धरून जामनेर हा शिवसेनेकडचा मतदारसंघ भाजपसाठी बदलून घेतला होता.

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा जामनेरमधून निवडणूक लढवण्यास विरोध होता, कारण तो मराठाबहुल मतदारसंघ असल्याने भाजपचा विजय अवघड वाटत होता. परंतु, मी स्वतः जबाबदारी घेत गिरीश महाजन यांना तिथे उभे केले आणि निवडून आणले.

गिरीश महाजन जोपर्यंत मंत्री राहिले, तोपर्यंत मी त्यांच्या मतदारसंघात पूर्ण सहकार्य केले. माझ्या जाहीर सभेविना त्यांची कोणतीही निवडणूक पूर्ण होत नव्हती. त्यामुळे आज ते जे काही मोठे झाले आहेत, त्यात नाथाभाऊंचे योगदान खूप मोठे आहे, याची आठवण खडसेंनी करून दिली.

अमित शाहांचा फोन आणि भाजप नेत्यांच्या ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप

आपल्या दिल्ली दौऱ्याचे वास्तव सांगताना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. खडसे म्हणाले की, मी स्वतःहून दिल्लीला गेलो नव्हतो, तर खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी मला फोन करून बोलावले होते. दिल्लीत गेल्यानंतर त्यांनीच मला पक्षात येण्याची गळ घातली आणि जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठवले.

परंतु, त्यानंतर स्थानिक नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला ब्लॅकमेल केल्याचा दावा खडसेंनी केला आहे. अमित शाह यांनी स्वतः मला सांगितले होते की, नाथाभाऊंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेच्या जागा पाडू, अशी धमकी स्थानिक नेते देत आहेत. देवेंद्र फडणवीस माझ्या वाढदिवसाला आले तर राजकारण सोडून देईन, असे आव्हान देणारे नेमके कोण होते? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title:
संबंधित बातम्या