Vinayak Raut Family Case: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. विनायक राऊत यांचे सुपुत्र नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नी गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबाविरुद्ध ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या मंडळींनी आपल्यावर जादूटोणा केल्याचा आणि आपला गंभीर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी राऊत कुटुंबाविरुद्ध ‘अंधश्रद्धा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गिरीजा यांनी आरोप केला आहे की, घरात भोंदू बाबांना बोलावून त्यांच्यावर अघोरी प्रकार करण्यात आले, बळजबरीने डोक्याचे केस काढण्यात आले आणि सक्तीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले गेले.
मासिक पाळीची नोंद आणि राजकीय कार्यक्रमांसाठी गोळ्या घेण्याचा दबाव
पोलिसांना दिलेल्या सविस्तर जबाबात गिरीजा यांनी सासू शामल राऊत आणि पती गितेश यांच्यावर अत्यंत विकृत वागणुकीचे आरोप केले आहेत. पती गितेश हा त्यांच्या पुढच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद स्वतःच्या मोबाईल फोनवर ठेवायचा.
तसेच विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे सतत विविध राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरू असायचे. या कार्यक्रमांमध्ये कोणतीही अडचण किंवा अडथळा येऊ नये म्हणून सासू शामल राऊत आणि पती गितेश हे त्यांना मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासाठी वारंवार दबाव टाकायचे.
या औषधांमुळे दर महिन्याला शरीरावर प्रचंड विपरित परिणाम होऊन गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे गिरीजा यांनी म्हटले आहे. याशिवाय सासूकडून सतत घरच्यांवरून टोमणे मारणे आणि मानसिक छळ करणे सुरू असायचे.
हनीमून आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक
लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांतील अनुभवांचा पाढा वाचताना गिरीजा यांनी सांगितले की, जेव्हा त्या पतीसोबत उटी येथे ६ दिवसांच्या हनीमूनसाठी गेल्या होत्या, तेव्हा पतीने शारीरिक जवळीक साधण्यास साफ नकार दिला. याविषयी विचारणा केली असता, ‘शारीरिक संबंध महत्त्वाचे नसून मानसिक जोड असणे गरजेचे आहे’ असे सांगत पतीने त्यांना टाळले.
“केवळ आंतरराष्ट्रीय ठिकाणीच संबंध ठेवू शकतो”; पतीच्या विकृत मानसिकतेचा दावा
शारीरिक संबंधांवरून पतीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समजूतींचा आणि क्रूरतेचा उल्लेखही या तक्रारीत करण्यात आला आहे:
- परदेश दौऱ्यावरील मारहाण: सन 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले असताना, जेव्हा गिरीजा यांनी पतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पतीने त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि संपूर्ण दौऱ्यात उपाशी ठेवून छळ केला. “जर मला हात लावशील तर विधवा होशील,” अशी थेट धमकीही पतीने दिली.
- अजब युक्तिवाद: पतीचे असे मत होते की तो भारतात शारीरिक संबंध ठेवू शकत नाही, तो केवळ आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवरच कम्फर्टेबल असतो.
- घरच्या वातावरणाचे कारण: मुंबईच्या घरात जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आईला (शामल राऊत) आवाज जाईल आणि मालवणच्या घरात प्रयत्न केल्यास खाली असणाऱ्या मदतनिसाला सगळं ऐकू जाईल, अशी कारणे देऊन पती नेहमी दूर लोटायचा आणि स्वतःला खूप नाजूक मुलगा म्हणवून घ्यायचा.
सासरच्या या अमानुष आणि विकृत त्रासाला कंटाळून अखेर माजी खासदाराच्या सुनेने पोलिसांचे दार ठोठावले आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आता विनायक राऊत यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











