Home / महाराष्ट्र / Fadnavis-Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे मध्यरात्री भेटले ! चर्चा सुरू होताच फडणवीसांचा खुलासा! बातमी खोटी

Fadnavis-Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे मध्यरात्री भेटले ! चर्चा सुरू होताच फडणवीसांचा खुलासा! बातमी खोटी

Fadnavis-Uddhav Thackeray : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मध्यरात्री गुप्त...

By: Team Navakal
Fadnavis-Uddhav Thackeray
Social + WhatsApp CTA

Fadnavis-Uddhav Thackeray : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मध्यरात्री गुप्त भेट झाल्याच्या दाव्यामुळे आज महाराष्ट्रात खळबळ उडाली. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची अटकळ बांधली जात असली तरी या भेटीकडे फडणवीस आणि ठाकरे यांच्यात पुन्हा संवाद सुरू होण्याच्याही दृष्टीनेही पाहिले जात आहे. यामागे एकनाथ शिंदेंना शह देण्याचे राजकारणही असू शकेल. विशेष म्हणजे, शिवसेना फुटीपूर्वी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी मध्यरात्रीच होत असत. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते. मात्र, या भेटीवरून चर्चा सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीच भेट झाली नाही, असा खुलासा केला.


प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या सोशल मीडिया हँडलने 23 एप्रिल रोजी सर्वप्रथम हा गौप्यस्फोट केला. गेल्या बुधवारी मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, अशी पोस्ट या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली होती. नंतर एका इंग्रजी दैनिकानेही ही बातमी देताच तिची चर्चा सुरू झाली. विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 12 मे रोजी होणार्‍या मतदानाच्या आधी सगळ्याच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. या परिस्थितीत ठाकरे-फडणवीस भेटीचा दावा करण्यात आल्याने ही केवळ औपचारिक भेट होती की, मोठ्या राजकीय समीकरणांची सुरुवात आहे, यावर तर्क-वितर्कांना उधाण आले. या भेटीवर नेत्यांनी दिलेली उत्तरे सूचक मानली जात आहेत.


या भेटीची खातरजमा करण्यासाठी आज सकाळी खा. संजय राऊत यांना प्रश्न विचारला, तेव्हा थेट उत्तर टाळून ते एवढेच म्हणाले की, या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का, या प्रश्नाचे उत्तर तेच देतील. देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे वृत्त स्पष्ट फेटाळले. ते म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही भेट घडलेली नाही. उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपूनछपून करण्याची आवश्यकता नाही. ती अगदी उघडपणे होऊ शकते. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत, जे लपवण्याची आवश्यकता आहे. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात, या खोटारड्या सोशल मीडिया हँडलना नोटीस बजावली जाईल.
भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत.


तर ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक जीतरत्न पटाईत आपली बातमी खरीच असल्याचा दावा करत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याआधी किती लपूनछपून भेटी घेतल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अमृता फडणवीस यांनीदेखील विविध प्रसंगी त्याबाबत खुलासे केले आहे. मुख्यमंत्री म्हणत आहेत बातमी खोटी आहे. नोटीस पाठवणार आहेत. तर येऊद्या नोटीस मग बघू.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या