Indo-Chinese Dishes : भारतातील तरुणाईच्या जिभेवर रेंगाळणारी आणि ‘गो-टू मिल’ म्हणून ओळखली जाणारी ‘इंडो-चायनीज’ खाद्यशैली आज एका वळणावर येऊन ठेपली आहे. या अनोख्या चवीचे जनक आणि मुंबईतील सुप्रसिद्ध ‘चायना गार्डन’ उपाहारगृहाचे संस्थापक नेल्सन वांग यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय खाद्यविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, ज्यांनी चिनी पाककृतीला भारतीय मसाल्यांची जोड देऊन एक नवी ओळख निर्माण केली.
सामान्यतः असा एक मोठा गैरसमज जनमानसात पसरलेला आहे की, भारतात मिळणारे सर्व चायनीज पदार्थ हे मूळचे चीनमधील आहेत. परंतु, सत्य याच्या अगदी उलट आहे. चीनमधील २३ प्रांतांमधील पारंपरिक पाककला ही अत्यंत साधी, उकडलेली आणि कमी मसालेदार असते. तिथे ‘व्हेज मंचुरियन’ किंवा ‘मंचुरियन ग्रेव्ही’ यांसारख्या चटपटीत पदार्थां क्वचितच आढळत असावी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या ‘मंचुरिया’ प्रांतावरून या पदार्थांना नाव मिळाले, तिथल्या स्थानिकांनाही ‘चिकन मंचुरियन’ किंवा ‘गोभी मंचुरियन’ यांसारख्या डिशेस ठाऊक नसतील; कारण हे पदार्थ पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहेत.
भारतीय ‘चायनीज’चा रंजक प्रवास: चिनी नाव अन् अस्सल भारतीय बनावट!
आधुनिक जीवनशैलीत ‘चायनीज’ पदार्थ हे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे झाले आहेत. विशेषतः तरुण वर्गासाठी तर हे हक्काचे ‘गो-टू मिल’ बनले आहे. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे अनेक दावे वारंवार केले जातात, तरीही खवय्यांच्या पसंतीमुळे या पदार्थांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मात्र, या आवडीच्या पदार्थांबाबत आपल्याकडे एक मोठा ‘गोड गैरसमज’ प्रचलित आहे, तो म्हणजे-हे सर्व पदार्थ मूळचे चीनमधील आहेत. वास्तवात, आपण जे चायनीज पदार्थ आवडीने फस्त करतो, त्यातील बहुतांश चवींचा चीनशी दूर दूर पर्यंत संबंध नाही.
नेल्सन वांग हे मूळचे कोलकात्याचे, परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मुंबईला आपली कर्मभूमी बनवले. १९७० च्या दशकात मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) मध्ये काम करत असताना, त्यांनी एका ग्राहकाच्या मागणीवरून आल्या-लसणाच्या फोडणीत सोय सॉस आणि कॉर्नफ्लोर घालून एक प्रयोग केला, ज्यातून ‘मंचुरियन’ या अजरामर पदार्थाचा जन्म झाला. पुढे त्यांनी ‘चायना गार्डन’ या नावाने स्वतःची उपाहारगृह साखळी सुरू केली, जी अल्पावधीतच सेलिब्रिटी आणि खवय्यांचे आवडते ठिकाण बनली.
आज गल्लोगल्ली मिळणारे चायनीज पदार्थ हे आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत. हे पदार्थ आरोग्यासाठी किती हितकारक आहेत, यावर अनेकदा चर्चा होते, तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. नेल्सन वांग यांनी केवळ पदार्थ बनवले नाहीत, तर भारतीय चवीला साजेसे एक नवे जागतिक ‘फ्यूजन’ तयार केले. चीनलाही अपरिचित असलेल्या या ‘भारतीय चायनीज’ चवीचा वारसा नेल्सन वांग यांच्या रूपाने कायम स्मरणात राहील.
चिनी पेहरावातील भारतीय पाहुणा: ‘मंचुरियन’च्या रंजक जन्माची शौकीन गोष्ट
हे चायनीज पदार्थ चीनमधून आले नसून, ते अस्सल भारतीय मातीतील ‘जुगाड’ आणि कल्पकतेचे अपत्य आहेत. गमतीची गोष्ट अशी की, जर एखाद्या चिनी नागरिकाला आपण प्रेमाने ‘गोभी मंचुरियन’ खायला घातले, तर त्याला त्या पदार्थाची चव आणि नाव दोन्ही नवीन वाटतील; कारण त्यांच्या २३ प्रांतांपैकी एकाही प्रांतात अशा तिखट-जाळ आणि चटपटीत पदार्थाचा मागमूसही नाही.
या रंजक खाद्यप्रवासाचे श्रेय जाते ते मुंबईतील ख्यातनाम आचारी नेल्सन वांग यांना. त्यांनी भारतीय खवय्यांच्या तिखट आणि मसालेदार जिभेची नस अचूक ओळखली होती. अस्सल चिनी जेवण हे अत्यंत साधे, उकडलेले आणि चवीला सौम्य असते, जे कदाचित आपल्या ‘ठसकेबाज’ सवयींना रुचले नसते. म्हणून मग त्यांनी आल्या-लसणाची फोडणी, हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा आणि सोय सॉसचा काळपट रंग यांचा एक अनोखा संगम घडवून आणला आणि जन्माला आले ‘मंचुरियन’. हा पदार्थ इतका लोकप्रिय झाला की, आज तो भारताच्या गल्लीबोळातील गाड्यांपासून पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्वांचा लाडका बनला आहे.
अशा प्रकारे, ज्या पदार्थाला आपण ‘विदेशी’ समजून खातो, तो प्रत्यक्षात मुंबईच्या कुंपणात जन्मलेला आणि भारतीय मसाल्यांनी न्हाऊन निघालेला एक ‘देसी’ पदार्थच आहे. मंचुरिया प्रांतात राहणाऱ्या लोकांनाही या पदार्थाच्या अस्तित्वाची कल्पना नसावी, ही यातली सर्वात मोठी विनोदी आणि रंजक बाब आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘इंडो-चायनीज’ हे नाव केवळ एक पडदा आहे; त्यामागे दडलेली चव ही पूर्णपणे भारतीयच आहे.
शून्यातून विश्व निर्माण करणारा ‘मंचुरियन’चा किमयागार: नेल्सन वांग यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास-
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये ‘इंडो-चायनीज’ या चवीला जागतिक ओळख मिळवून देणारे थोर उद्योजक नेल्सन वांग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ एका यशस्वी व्यावसायिकाची गाथा नसून, तो अपार कष्ट, कल्पकता आणि चिकाटीचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. कोलकात्याच्या ‘चायना टाउन’मध्ये वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांचे बालपण गेले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी हैदराबाद आणि बेंगळुरू असा प्रवास केला, परंतु त्यांच्या नशिबाने त्यांना अखेर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून सोडले.
२० रुपयांच्या पगारापासून जागतिक कीर्तीपर्यंतचा प्रवास-
मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या ‘फ्रेडरिक्स रेस्तराँ’मध्ये नेल्सन वांग यांनी एका सामान्य कामगाराच्या रूपात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा त्यांचा मासिक पगार अवघा २० रुपये होता. मात्र, कामाप्रती असलेली निष्ठा आणि पाककलेतील गती पाहून ते अल्पावधीतच तिथले मुख्य आचारी बनले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर त्यांनी ‘चायना टाउन’ नावाच्या एका अत्यंत छोट्या उपाहारगृहात भागीदारी पत्करली. अवघ्या तीन टेबलांच्या या जागेतून त्यांच्या नशिबाने मोठे वळण घेतले. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज राजसिंह डुंगरपूर हे तिथे नियमित येत असत. वांग यांची कला ओळखून डुंगरपूर यांनीच त्यांना ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ (सीसीआय) मध्ये चिनी खाद्यगृह सुरू करण्याचे निमंत्रण दिले.
‘मंचुरियन’चा उगम: एक ऐतिहासिक प्रयोग-
‘सीसीआय’मधील वांग यांचा काळ अत्यंत परिश्रमाचा होता. पहाटे पाच वाजता बाजारहाट करण्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत ग्राहकांची सेवा करण्यापर्यंत ते स्वतःला झोकून देत असत. तिथे येणाऱ्या बड्या गिर्हाइकांच्या आणि क्रिकेटपटूंच्या ‘काहीतरी वेगळं बनव’ या आग्रहातूनच ‘चिकन मंचुरियन’चा जन्म झाला. डुकराचे मांस (पोर्क) न खाणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी आले-लसूण आणि सोय सॉसचा वापर करून हा प्रयोग केला, जो अभूतपूर्व यशस्वी ठरला. यातूनच पुढे गोभी मंचुरियन, पनीर मंचुरियन आणि बेबी कॉर्न मंचुरियन यांसारख्या शाकाहारी पदार्थांची मालिका सुरू झाली.
सेलेब्रिटींचे ‘चायना गार्डन’ आणि संस्कृती-सेतू
१९८३ मध्ये जुहू येथे सुरू झालेल्या ‘चायना गार्डन’ या उपाहारगृहाने बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडमधील ताऱ्यांचीही पसंती मिळवली. १९९० च्या दशकात या उपाहारगृहाच्या शाखा विस्तारल्या आणि दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमुळे नेल्सन वांग हे नाव घराघरांत पोहोचले. आज वांग यांचा व्यवसाय त्यांचे चिरंजीव सांभाळत असले, तरी त्यांनी ‘मंचुरियन’च्या माध्यमातून भारत आणि चीन यांच्यातील पाककलेचा जो अनोखा संस्कृती-सेतू बांधला आहे, तो त्यांच्या व्यावसायिक यशापेक्षा कितीतरी मोठा आणि अजरामर ठरेल.










