Mumbai Bandra Slum : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील ‘गरीब नगर’ या झोपडपट्टीमधील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आजपासून दोन दिवसीय भव्य मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने या भागातील ५ हजार चौरस मीटर जमिनीवर असलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे या परिसरातील चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
कायदेशीर प्रक्रियेचा प्रदीर्घ लढा
वांद्रे स्थानकाला लागूनच असलेल्या रेल्वेच्या हद्दीत तब्बल ४०९ पक्की बांधकामे अनधिकृतपणे उभारण्यात आली होती. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने ‘पब्लिक प्रिमायसेस ॲक्ट १९७१’ अंतर्गत कारवाई सुरू केली होती. ही जमीन रेल्वेची असल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने अनेकदा ही बांधकामे हटवण्याचे प्रयत्न केले; मात्र येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आणि त्यांना राजकीय पाठबळ लाभल्याने ही कारवाई प्रदीर्घ काळ रखडली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी, सुरक्षिततेच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने रेल्वेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
परिसरातील समस्या आणि आगीचा धोका
या झोपडपट्टीमुळे रेल्वे रुळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. येथील रहिवासी घरातील कचरा, सांडपाणी आणि लघुउद्योगांमधील टाकाऊ वस्तू थेट रेल्वे ट्रॅकवर टाकत असत. यामुळे वांद्रे स्थानक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. विशेष म्हणजे, या कचऱ्यामुळे या भागात वारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर होत होता. स्थानिक प्रशासन, बीएमसी आणि राज्य सरकारने येथे वीज व पाणी पुरवठा केल्याने अनेक अनधिकृत लघुउद्योगही या ठिकाणी फोफावले होते.
कारवाईपूर्वीच नागरिकांचे स्थलांतर
रेल्वेच्या मोहिमेची पूर्वकल्पना मिळाल्याने आणि संभाव्य कारवाईची तीव्रता पाहून अनेक रहिवाशांनी स्वतःहून आपली घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. घरातील फ्रिज, कुलर आणि इतर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर आणून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेले नागरिक आता बेघर होणार असल्याने परिसरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
कडक पोलीस बंदोबस्त आणि राजकीय भेट
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने वांद्रे परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. यामध्ये स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाच्या (SRPF) जवानांचाही समावेश आहे. दरम्यान, ही मोहीम सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. परंतु तिथल्या लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि महत्त्वाच्या जमिनीचा विकास करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.










