Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या १७ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर आज राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघावर दावा ठोकण्यासाठी महायुतीमधील विविध घटक पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
सक्षणा सलगर यांची सुनेत्रा पवारांशी भेट: नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील आक्रमक वक्त्या आणि युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी आज अचानक ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सक्षणा सलगर या सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात, मात्र त्यांच्या या भेटीमुळे त्या विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या सलगर यांनी २०१९ च्या निवडणुकीत महायुतीविरोधात रान उठवले होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्या उत्सुक होत्या, मात्र तिथे संधी न मिळाल्याने आता त्या विधानपरिषदेच्या माध्यमातून विधीमंडळात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड आणि हिंगोली-परभणीवरून दावा-प्रतिदावा-
नांदेडच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असल्याने, ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) नेते अर्जुन खोतकर यांनीही आज देवगिरीवर हजेरी लावली. खोतकर यांनी हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर दावा केला असून, आपली कन्या दर्शना खोतकर यांच्यासाठी त्यांनी उमेदवारीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. सत्तेतील अनेक बडे नेते आता आपल्या नातेवाईकांसाठी लॉबिंग करत असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महायुतीची निर्णायक बैठक आज ‘वर्षा’वर-
जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या जागांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जोरदार चढाओढ सुरू असून, आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे स्वरूप आणि वेळापत्रक-
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे विधानपरिषदेच्या या जागा रिक्त होत्या. नियमानुसार ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असल्याने आता या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, यवतमाळ आणि अमरावती यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे-
अधिसूचना: २५ मे
अर्ज भरण्याची अंतिम मुदत: १ जून
छाननी: २ जून
अर्ज माघारीची मुदत: ४ जून
मतदान: १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी: २२ जून











