Home / महाराष्ट्र / Maharashtra School : राज्यातील शाळांबाबत मोठी बातमी! आठवड्यातून फक्त ३ दिवस शाळा ठेवा; दोन दिवस ऑनलाईन वर्ग करण्याची सरकारकडे मागणी!

Maharashtra School : राज्यातील शाळांबाबत मोठी बातमी! आठवड्यातून फक्त ३ दिवस शाळा ठेवा; दोन दिवस ऑनलाईन वर्ग करण्याची सरकारकडे मागणी!

Maharashtra School : राज्यातील इंधन दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी आता शालेय शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पुढील महिन्यात राज्यभरात...

By: Team Navakal
Maharashtra School
Social + WhatsApp CTA

Maharashtra School : राज्यातील इंधन दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी आता शालेय शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पुढील महिन्यात राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे स्कूल बस मालकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, स्कूल बस संघटनांनी सरकारकडे शाळांच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी केली असून, पालकांच्या खिशालाही दरवाढीची झळ सोसावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ आणि अनुदानाची मागणी
इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे जुन्या दरात बस सेवा पुरवणे आता अशक्य असल्याचे ‘स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन’ने म्हटले आहे. बस मालकांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, शाळांचे नियोजन अशा प्रकारे करावे जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी होईल. “आठवड्यातून केवळ तीन दिवस प्रत्यक्ष शाळा भरवाव्यात आणि उर्वरित दोन दिवस ‘ऑनलाइन’ वर्ग सुरू ठेवावेत,” असा प्रस्ताव संघटनेने मांडला आहे. तसेच, वाढत्या खर्चामुळे बस शुल्कात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे संकेत देत, सरकारने या क्षेत्राला तातडीने अनुदान किंवा करात सवलत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. १ जूनपर्यंत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.

इंधन दरवाढीचा दहा दिवसांतील भयावह आलेख
गेल्या केवळ दहा दिवसांच्या कालावधीत इंधन दरांनी नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहेत. या दहा दिवसांत चार वेळा दरवाढ झाली असून, पेट्रोलच्या दरात एकूण ७ रुपये ३८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ७ रुपये ०९ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारच्या ताज्या दरवाढीनुसार पेट्रोल २.६१ रुपयांनी आणि डिझेल २.१७ रुपयांनी महागले आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असून त्याचे थेट पडसाद आता विद्यार्थ्यांच्या बस भाड्यावर उमटताना दिसत आहेत.

नागपुरात बस भाड्यात १५ टक्क्यांपर्यंत वाढ
राजधानी मुंबईसोबतच उपराजधानी नागपुरातही महागाईचा फटका बसला आहे. नागपूर स्कूल बस आणि व्हॅन संघटनेने बस भाड्यात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जे पालक आतापर्यंत १००० रुपये भाडे देत होते, त्यांना आता १२०० रुपये मोजावे लागतील, तर २००० रुपये भाडे असणाऱ्यांना २४०० रुपये द्यावे लागतील. परिवहन विभागाच्या नवीन नियमांनुसार ही दरवाढ अधिकृतपणे मान्य केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विदर्भातील उष्णतेची लाट: शाळा १५ ऐवजी २६ जूनला?
दुसरीकडे, विदर्भातील कडाक्याच्या उन्हाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. १० जूननंतरही जर उष्णतेची लाट कायम राहिली, तर विदर्भातील शाळा नेहमीप्रमाणे १५ जून रोजी सुरू न करता थेट २६ जून रोजी सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या