Mangalwedha Reel Star : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये हिने मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, ज्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणीने अनेक लोकप्रिय व्हिडीओ बनवून लाखो चाहत्यांची मने जिंकली, त्याच ठिकाणी तिने मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे सोशल मीडिया विश्वात आणि तिच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या रोहिणी आणि तिचे पती नीलेश पाराध्ये हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय होते. ग्रामीण जीवनशैली, महाराष्ट्राची अस्सल खाद्यसंस्कृती आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित त्यांचे रील्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असत. या दाम्पत्याने ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. हे हॉटेल केवळ त्यांच्या उपजीविकेचे साधन नव्हते, तर त्यांच्या अनेक स्वप्नांचे प्रतीक होते. याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात गावरान खाद्यपदार्थ तयार करतानाचे त्यांचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत असत, ज्यावर फॉलोअर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी रोहिणीने हॉटेलच्या स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. ही बाब तिचे पती नीलेश यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने रोहिणीला खाली उतरवून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रोहिणीच्या निधनाची वार्ता समजताच ब्रह्मपुरी परिसरासह सोशल मीडियावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या हसतमुख चेहऱ्याने रोहिणीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. रोहिणीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.











