Ramdas Athawale : मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यावरून भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मीरा रोड, घाटकोपर आणि गोरेगाव यांसारख्या भागांत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी भाजपला सबुरीचा सल्ला दिला आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माला स्वतःचे अधिकार दिले असून कोणीही धार्मिक भावना भडकवू नयेत, अशा शब्दांत आठवले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
बुधवारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भांचा आधार घेत सामंजस्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “मुघल भारतात येण्यापूर्वी येथील सर्व नागरिक हे हिंदूच होते, जे नंतर धर्मांतरित झाले. त्यामुळे भारतातील मुस्लीम समाज ही काही औरंगजेबाची संतान नसून ती आपलीच माणसे आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था पाहिली तरी मूळचे सर्वजण भारतीयच आहेत. त्यामुळे आताच्या काळात कोणाचेही नाव घेऊन धार्मिक द्वेष पसरवणे अयोग्य आहे.” आठवले यांनी पुढे असेही नमूद केले की, मग ते भाजपचे लोक असोत किंवा अन्य कोणी, संविधानाला छेद देणारे कृत्य कोणाकडूनही होता कामा नये.
मिरा रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला गदारोळ पाहता, प्रशासनाने बुधवारी मोठी कारवाई केली. पूनम इस्टेट क्लस्टर-३ मधील सोसायट्यांमध्ये आणलेले सुमारे पाच ते सात बकरे पोलिसांनी चोख बंदोबस्तात महानगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर हलवले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काशीमीरा पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास ही खबरदारीची उपाययोजना केली. परिसरात वातावरण शांत राहण्यासाठी पोलिसांच्या गाड्या आणि टेम्पोचा वापर करून हे बकरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
आज बकरी ईदच्या निमित्ताने संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता राखण्यासाठी सुमारे ५२५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.











