Home / महाराष्ट्र / Matoshree : मातोश्रीवर बैठक! सर्व खासदार उपस्थित ? संजय राऊतांचा दावा! मात्र नेत्यांच्या वक्तव्यांत विसंगती

Matoshree : मातोश्रीवर बैठक! सर्व खासदार उपस्थित ? संजय राऊतांचा दावा! मात्र नेत्यांच्या वक्तव्यांत विसंगती

Matoshree : शिंदे सेना येत्या आठ दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’ करून उबाठाचे 7 खासदार फोडणार या चर्चेने राजकीय वातावरण तापले...

By: Team Navakal
Aditya Thackeray
Social + WhatsApp CTA

 Matoshree : शिंदे सेना येत्या आठ दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’ करून उबाठाचे 7 खासदार फोडणार या चर्चेने राजकीय वातावरण तापले असताना उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर काहींनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र इतर नेत्यांनी विसंगत उत्तरे दिल्याने उपस्थितबाबत संशय निर्माण झाला आहे. उबाठाचे लोकसभेत 9 आणि राज्यसभेत संजय राऊत असे एकूण 10 खासदार आहेत.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 जून रोजी दिल्ली दौर्‍यावर असताना उबाठाच्या सात खासदारांनी त्यांची गुप्त भेट घेतली होती. या भेटीनंतर ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असून, संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक बोलावली. ही बैठक उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे चार खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित होते. खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील-आष्टीकर,  खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे पाच खासदार ऑनलाईन सहभागी झाले, असा दावा करण्यात आला. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाल्यामुळे ते बैठक सुरू झाल्यानंतर सुमारे एका तासाने दाखल झाले. माजी खासदार विनायक राऊतही उपस्थित होते.


परभणीचे खासदार संजय जाधव आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सुरुवातीला ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चा होती.  खासदारकी मिळत नसल्याने संजय जाधव हे गेला काही काळ नाराज आहेत आणि ही नाराजी ते उघडपणे बोलून दाखवत आहेत. आजही  संजय जाधव हे मुंबईला न येता परभणीतील ‘धोंडे’ कार्यक्रमात उपस्थित राहिले. त्यांचा तेथील  व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले. मात्र, संजय राऊत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले की, वाकचौरे व जाधव बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. परंतु याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.


बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित पाच खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला. ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असून, त्या ठिकाणाहून त्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी असल्याने ते शिर्डीतील रुग्णालयातून बैठकीत सहभागी झाले. (अनिल देसाई यांनी मात्र म्हटले की वाकचौरे यांच्या पत्नी हैदराबाद येथे उपचार घेत आहेत.) नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार असल्याने ते प्रचारात व्यस्त होते, मात्र त्यांनीही ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी मुलीच्या लग्नासंदर्भात तयारीमुळे ते देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले. नऊच्या नऊ खासदारांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. (विनायक राऊत यांनी मात्र म्हटले की, लोकसभेच्या 9 खासदारांपैकी 8 खासदार बैठकीत उपस्थित होते.) या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मार्गदर्शन केले. काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, ते पुढील तीन दिवसांत मातोश्रीवर येऊन ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे  माध्यमांनी अफवा पसरवू नयेत. संजय बंडू जाधव यांच्याशीही संवाद झाला असून, ते एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष भेट घेतील.


अनिल देसाई म्हणाले की, मुंबईतील तीन आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे असे चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पाच खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. काहींना वैयक्तिक कारणे होती. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी आहे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नीवर हैदराबादमध्ये उपचार सुरू आहेत, तर संजय देशमुख यांच्या घरी लग्नाचे कार्य आहे. ही बैठक नियमित स्वरूपाची असून संघटनात्मक कामकाज, आंदोलनाची दिशा, महागाई, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि कर्जमाफी यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर या उलटसुलट माहितीमुळे उपस्थितीबद्दल संभ्रम आहे. त्यातच आज उपस्थित खासदार फुटणार नाहीत याची खात्री देता येत नाही. यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या