Home / महाराष्ट्र / Mumbai Local Train : मुंबईची लाईफलाईन पुन्हा ‘ठप्प’?दिवा स्थानकावरील ‘गर्दी’चे फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का…

Mumbai Local Train : मुंबईची लाईफलाईन पुन्हा ‘ठप्प’?दिवा स्थानकावरील ‘गर्दी’चे फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का…

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या नशिबी असलेला हालअपेष्टांचा फेरा संपण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी डोंबिवली स्थानकात झालेल्या रेल्वे...

By: Team Navakal
Mumbai Local Train 
Social + WhatsApp CTA

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या नशिबी असलेला हालअपेष्टांचा फेरा संपण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी डोंबिवली स्थानकात झालेल्या रेल्वे अपघाताचे सावट अजूनही कायम असतानाच, आज सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. विशेषतः दिवा रेल्वे स्थानकात आज सकाळी प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली, ज्याचे भीषण वास्तव दर्शवणारे छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत.

दिवा स्थानकात प्रवाशांचा महापूर-
आज पहाटेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने जाणाऱ्या ‘अप’ मार्गावरील लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. या विलंबाचा सर्वाधिक फटका दिवा स्थानकाला बसला असून, तेथील फलाटांवर प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. फलाटाच्या दोन्ही बाजूंना अगदी टोकापर्यंत प्रवाशांच्या रांगा लागल्या असून, यामध्ये नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे वेळेवर येत नसल्याने आणि येणाऱ्या गाड्या आधीच खच्चून भरलेल्या असल्याने अनेक प्रवाशांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले.

विलंबाचे नेमके कारण काय?
अधिकच्या माहितीनुसार, आजच्या या विस्कळीत वाहतुकीमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, सोमवारी डोंबिवलीत झालेल्या अपघातामुळे कोलमडलेले वेळापत्रक अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही. दुसरे तांत्रिक कारण म्हणजे, सोमवारी रात्री खर्डी स्थानकाजवळ एक अत्यावश्यक दुरुस्तीचा ‘ब्लॉक’ घेण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकानुसार हा ब्लॉक पहाटे ३ वाजता संपणे आवश्यक होते, जेणेकरून सकाळची वाहतूक सुरळीत सुरू होईल. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा ब्लॉक सकाळी ६ वाजेपर्यंत लांबला. परिणामी, पहाटेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबवून धरावे लागले, ज्याचा परिणाम संपूर्ण सकाळच्या सत्रावर झाला.

डोंबिवलीतील त्या अपघाताची पार्श्वभूमी-
मध्य रेल्वेची ही दुरवस्था सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ झालेल्या एका अपघातापासून सुरू झाली. कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणारी एक रिकामी लोकल ट्रेन डोंबिवली स्थानकातून मार्गस्थ होत असताना तिचा प्रथम श्रेणीचा डबा रुळावरून घसरला. सुदैवाने, ही ट्रेन प्रवाशांनी भरलेली नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन-अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर हा डबा पुन्हा रुळावर आणला खरा, परंतु या दरम्यान मध्य रेल्वेची मुख्य आणि धिम्या गतीची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती.

प्रवाशांचा संताप आणि रेल्वेचे आव्हान-
सलग दोन दिवस कामावर पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी अशा तांत्रिक बिघाडांमुळे आणि रेंगाळणाऱ्या कामांमुळे मुंबईची ही जीवनवाहिनी वारंवार रखडत असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या