Home / महाराष्ट्र / Vidhan Parishad Election 2026 : “तुम्ही जागा लढवा, आम्हाला पालकमंत्रीपद द्या…”अनिकेत तटकरेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी भरत गोगावलेंनी मागितलं थेट पालकमंत्रीपद!

Vidhan Parishad Election 2026 : “तुम्ही जागा लढवा, आम्हाला पालकमंत्रीपद द्या…”अनिकेत तटकरेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी भरत गोगावलेंनी मागितलं थेट पालकमंत्रीपद!

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेषतः रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग...

By: Team Navakal
Vidhan Parishad Election 2026
Social + WhatsApp CTA

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेषतः रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीमध्ये एक मोठी राजकीय ‘डील’ झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या नव्या तडजोडीनुसार, शिवसेनेने या जागेवरील आपला दावा मागे घेत ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून, त्यांच्या विजयासाठी शिवसेनेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मात्र, ही जागा सोडताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक अत्यंत कळीची अट ठेवली होती, जी आता मान्य झाल्याचे समजते.

गेल्या सव्वा वर्षांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेकडून भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे या दोघांच्या नावाचा आग्रह धरला जात होता. या संघर्षात अखेर तोडगा काढण्यात आला असून, विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला देण्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या पदरात पडणार आहे. या राजकीय देवाणघेवाणीमुळे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. महायुतीच्या सुरुवातीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार भाजपला १२, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला २ जागा देण्याचे ठरले होते, परंतु शिवसेनेने सात जागांची मागणी करत काही विशिष्ट मतदारसंघांवर आग्रह धरला होता. त्यातूनच हा अदलाबदलीचा यशस्वी फॉर्म्युला समोर आला आहे.

दरम्यान, या राजकीय घडामोडींचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतही उमटले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी पार पडलेली बैठक कमालीची वादळी ठरली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रदीर्घ काळापासूनची खदखद उघडपणे व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवताना आणि पक्ष एकसंध ठेवताना आपण व प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या कष्टांची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, गेल्या काही काळापासून आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर जी टीका होत आहे, त्या काळात पक्षातील एकाही नेत्याने किंवा आमदाराने आपली बाजू सावरून धरली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवेळीही आपल्यालाच टीकेच्या धनी व्हावे लागले, अशा शब्दांत त्यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात काही मुद्द्यांवरून शाब्दिक चकमकही उडाली, ज्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत असूनही या बैठकीला गैरहजर राहणे, हे देखील राजकीय वर्तुळात चर्चेचे निमंत्रण देणारे ठरले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या