Prasad Lad Meet Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील नियोजित भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या भेटीपूर्वीच प्रसाद लाड यांना धमकावण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रसाद लाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि पोलिसांची कारवाई
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. या भेटीपूर्वीच त्यांच्या स्वीय सहायकाला (PA) धमकीचे फोन आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले या व्यक्तींनी लाड यांना धमकी दिली होती.
दरम्यान, प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत माहिती देताना प्रसाद लाड म्हणाले की, “दोन संशयित व्यक्ती हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी निवेदन देण्यासाठी आल्याचे सांगितले; मात्र त्यांचा उद्देश हल्ल्याचा होता. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.”
जरांगे पाटील यांचे ३० मे पासून आमरण उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यांनी येत्या ३० मे पासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, “जरांगे यांनी उपोषणाचे पाऊल उचलू नये,” असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी लाड यांना चर्चेसाठी आंतरवाली सराटीत येण्याचे निमंत्रण दिले होते. लाड यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून, आज ही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडणार आहे.
संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर विश्वास दर्शवत गावोगावी सुरू असलेल्या बैठका तूर्त स्थगित केल्या आहेत. “प्रसाद लाड यांच्यामध्ये आम्हाला समाजाविषयी तळमळ दिसून आली, म्हणूनच आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या, तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही,” असे स्पष्ट मत जरांगे यांनी व्यक्त केले.
प्रसाद लाड यांनीदेखील या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक भूमिकेतून पाहण्याचे आवाहन केले आहे. “मी स्वतः एक मराठा आहे आणि मला या विषयात राजकारण करायचे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेतून नक्कीच सकारात्मक मार्ग काढतील,” असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.










