Pratap Sarnaik : आगामी १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. या दिवसापासून राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी करण्यासोबतच, त्यांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ तपासणी करणे हा नसून, अमराठी चालकांच्या मनातील मराठी भाषेविषयीची भीती दूर करणे आणि त्यांना दैनंदिन कामासाठी आवश्यक असलेली मराठी भाषा आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात कठोर पावले उचलली असून, रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाहनचालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान (Working Knowledge) अनिवार्य करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. विशेषतः मोटार वाहन नियमांमधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या प्रस्तावानुसार, या बदलांसाठी मसुदा अधिसूचना (Draft Notification) काढण्याची प्रक्रिया सध्या प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
कायद्यातील नवीन तरतुदी आणि बदल-
१. परवाना पडताळणी: सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचा परवाना (Authorization) देताना संबंधित चालकाच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची कठोरपणे चाचणी घेतली जाईल.
२. अतिरिक्त अटी: मीटर असलेल्या मोटार कॅब किंवा टॅक्सींच्या परवाना अटींमध्ये मराठी भाषेच्या ज्ञानाचा समावेश अनिवार्य अट म्हणून केला जाणार आहे.
३. नूतनीकरणासाठी सक्ती: रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या (License Renewal) वेळी मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध करणे आता बंधनकारक असेल.
४. संवाद सुलभता: या नियमामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांशी रिक्षा व टॅक्सी चालक अधिक प्रभावीपणे आणि स्थानिक भाषेत संवाद साधू शकतील, ज्यामुळे वादाचे प्रसंग कमी होतील.
या प्रस्तावित मसुद्यावर नागरिकांकडून तसेच विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासन गांभीर्याने विचार करणार आहे. विशेष म्हणजे, ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी यांसारख्या सेवांमध्ये कार्यरत असलेल्या अमराठी चालकांसाठीही हा नियम लागू असेल.











