Pune Crime : पुणे जिल्ह्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. नसरापूर आणि पर्वती येथील घटनांच्या जखमा ताज्या असतानाच आता मुळशी तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परप्रांतीय आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय मतिमंद बालिकेचा विनयभंग केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मुळशीतील घटना: आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने नराधमाचे कृत्य-
मुळशी तालुक्यातील एका गावात दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेला पिंटू शिवकुमार हा नराधम दुचाकीवरून फिरून आईस्क्रीम विकण्याचे काम करतो. पीडित १४ वर्षीय मतिमंद मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी या विक्रेत्याकडे गेली होती. यावेळी आरोपीने निर्लज्जपणाचा कळस गाठत बालिकेला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. बालिकेने आरडाओरडा केल्यानंतर ती तातडीने घरी पळाली आणि तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी परिसरात शोध मोहीम राबवून पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले आणि त्याला पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या निमित्ताने गावागावात फिरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची आणि त्यांच्या वाहनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पर्वती: रक्ताच्या नात्यातील विश्वासघात-
पुण्यातील पर्वती पायथ्याशीही अशीच एक घृणास्पद घटना उघडकीस आली. येथे एका ७० वर्षीय आजोबाने आपल्या ९ वर्षांच्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. आरोपीने नातूला खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवले आणि नातीशी गैरवर्तन सुरू केले. सुदैवाने, शेजारील महिलेने वेळीच हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला. संतप्त नागरिकांनी या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नसरापूर: साडेतीन वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या-
जिल्ह्यातील सर्वात भीषण घटना नसरापूर येथे घडली असून, येथे सुट्टीसाठी आलेल्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील नराधमाला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे पाहून ग्रामस्थ आणि प्रशासनानेही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांची सुरक्षिततेबाबत वाढती चिंता-
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या तीनही घटनांमुळे पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल न करता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.










