Home / क्रीडा / DC Vs CSK : आयपीएल २०२६: संजू सॅमसनचे वादळी अर्धशतक; चेन्नई सुपर किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर ८ गडी राखून दिमाखदार विजय

DC Vs CSK : आयपीएल २०२६: संजू सॅमसनचे वादळी अर्धशतक; चेन्नई सुपर किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर ८ गडी राखून दिमाखदार विजय

DC Vs CSK : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपली विजयी घौडदौड कायम राखत दिल्ली कॅपिटल्सचा...

By: Team Navakal
DC Vs CSK
Social + WhatsApp CTA

DC Vs CSK : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपली विजयी घौडदौड कायम राखत दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला आहे. संजू सॅमसनची आक्रमक फटकेबाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर चेन्नईनं दिल्लीनं दिलेलं १५६ धावांचं लक्ष्य अवघ्या १७.३ षटकांत पूर्ण केलं. या विजयामुळे चेन्नईने यंदाच्या हंगामातील १० सामन्यांपैकी आपला पाचवा विजय नोंदवला असून, दिल्लीला मात्र सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्लीची संथ सुरुवात आणि मधल्या फळीचा संघर्ष-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय सुरुवातीला फसला. चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचे आघाडीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. केएल राहुल (१२), पथुम निसंका (१९), नितीश राणा (१५) आणि करुण नायर (१३) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अवघ्या ६९ धावांत ५ गडी गमावल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र, त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स (३८ धावा) आणि समीर रिझवी (२४ चेंडूत नाबाद ४० धावा) यांनी सहाव्या गड्यासाठी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रिझवीने आपल्या खेळीत चार उत्तुंग षटकार लगावत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या ५ षटकांत ५८ धावा कुटल्यामुळे दिल्लीने ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली.

संजू सॅमसनचे ‘विश्वरूप’ आणि चेन्नईचा सहज विजय-
१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (६) आणि उर्विल पटेल (१७) लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर संजू सॅमसनने मैदानाचा ताबा घेतला. सॅमसनने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत ५२ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावांची विष्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ६ गगनभेदी षटकार ठोकले.

सॅमसनला कार्तिक शर्माने मोलाची साथ दिली. शर्माने ३२ चेंडूंत नाबाद ४१ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची अभेद्य भागीदारी रचली, ज्यामुळे चेन्नईने १५ चेंडू राखूनच विजयाचे लक्ष्य गाठले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या