Pune Crime : विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधी आघाडीचा पुणे शहराध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने, स्वतःच्याच कार्यालयातील महिला सहायक (सेक्रेटरी) पूनम दिनेश मुन (वय ३५) यांची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिन्ही सदस्यांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वादाची पार्श्वभूमी आणि हत्येचा घटनाक्रम-
मृत पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून मुंढवा परिसरातील एडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, संजय सावंत आणि पूनम मुन यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच संशयावरून गेल्या काही काळापासून त्यांच्यात सतत वादाच्या ठिणग्या पडत होत्या. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी या वादाने रौद्र रूप धारण केले. कार्यालयात उपस्थित असलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने मिळून पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रूरतेचा कळस गाठत आरोपींनी पूनम यांचे पाय दोरीने बांधले आणि त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूनम यांचा जागीच मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न-
हत्येनंतर घाबरलेल्या सावंत कुटुंबाने कायद्याचे रक्षक असूनही कायद्यालाच बगल देण्याचे ठरवले. त्यांनी मृतदेह पोत्यात भरून कार्यालयातील एका कोपऱ्यात लपवून ठेवला. संधी मिळताच दुसऱ्या दिवशी या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा कट होता. दरम्यान, पूनम यांचे पती दिनेश मुन यांनी पत्नी घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. त्यांनी संजय सावंत यांना संपर्क साधला असता, “पूनम कदाचित नातेवाइकांकडे गेल्या असतील,” असे सांगून सावंत याने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर रात्री उशिरा हताश होऊन कुटुंबियांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश-
दुसऱ्या दिवशी सकाळी, संशयाने ग्रासलेले दिनेश मुन पुन्हा संजय सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयाची पाहणी करत असताना त्यांना तिथे एक संशयास्पद पोते आढळून आले. ते उघडून पाहिले असता, त्यांना स्वतःच्या पत्नीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. या भीषण दर्शनाने हादरलेल्या दिनेश यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला गुन्ह्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या कुटुंबासह मिळून अशा प्रकारे कायद्याचा भंग केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.










