Rahul Gandhi : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीमुळे रद्द होऊन दोन आठवडे उलटले तरीही नव्या तारखेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाखो उमेदवारांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीईटीची नवी तारीख तत्काळ जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, शासनाने टीईटी परीक्षेची नवी तारीख आजच्या आज जाहीर करावी. पेपरफुटीला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रामाणिक उमेदवारांना त्रास देऊ नये. या पेपरफुटीमुळे ज्या उमेदवारांचे महत्त्वाचे वर्ष वाया गेले आहे, त्यांना वयोमर्यादेत शिथिलता द्या. जे देशाचे आणि राज्याचे भविष्य घडवणार आहेत, तेच आज स्वतःच्या भविष्यासाठी अंधारात चाचपडत आहेत. या भावी शिक्षकांनी वर्षानुवर्षे मेहनत केली, फॉर्म भरले, भरमसाठ फी दिली आणि परीक्षा देण्यासाठी दूरवरची केंद्रे गाठली. पण आज त्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षा आणि निराशा आली आहे.
पेपर फोडणारे मोकाट फिरत आहेत, भ्रष्ट यंत्रणास्वतःला वाचवत आहे आणि यात भरडला जात आहे तो फक्त प्रामाणिक उमेदवार आहे.पेपरफुटीच्या या देशव्यापी समस्येवर आणि तरुणांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोब्यावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी 17 जुलै रोजी डेहराडून येथे एका विशेष सभेचे आयोजन केले आहे. अन्यायाविरुद्ध आता शांत बसणार नाही, असा इशारा देत राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची गरज असल्याचेही म्हटले आहे.
राहुल गांधींना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की, सरकारने आधीच पुढाकार घेत कारवाई करून टीईटी पेपरफुटी करणार्यांना पकडले. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली. पेपर फुटल्यानंतर नव्हे, तर त्याआधीच ही कारवाई महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी केली आहे.पुढील परीक्षा योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी नियोजन सुरू असून, त्याच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील.राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातून केले आहे की देशातून, याची मला कल्पना नाही. कारण ते बहुतेक वेळा परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सर्व माहिती असतेच असे नाही. त्यांनी प्रथम स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे आणि त्यांच्या सरकारकडे पाहावे, त्यानंतरच अशा प्रकारची वक्तव्ये करावीत.










