Sunetra Pawar : अजित पवार आणि शरद पावर या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत असलेली खदखद उघड झाली आहे. लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचे म्हटले जात आहे. शरद पवार गटाच्या आमदारांची पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांत विधान भवनात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती उघड झाली आहे. या बैठकीत सर्व आमदारांनी भाजपा आणि एनडीएसोबत जाण्यास अनुकूलता दर्शवली. यामुळे शरद पवार लवकरच एनडीएत जाणार हे निश्चित आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार गटाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे सुनेत्रा पवारांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. ही नोटीस म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाला थेट आव्हान मानले जात आहे. त्यामुळे सच्चिदानंद यांच्यामागे नेमके कोण आहे, हे शोधून काढण्याची मोहीम आता सुरू झाली आहे. याबाबत मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीचा तपशील आता बाहेर येत आहे. शरद पवार गटाच्या एकूण 10 आमदारांपैकी 9 आमदार या बैठकीला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची मते आणि मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या. या बैठकीत बहुतेक आमदारांनी भाजपा आणि एनडीएसोबत जाण्याचा कल दर्शवला. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील न होता, थेट भाजपाप्रणीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करावे, अशी अट या आमदारांनी जयंत पाटलांना घातली आहे.
मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांसाठी मिळणारा शासकीय निधी आणि आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यासाठी सत्तेसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत या आमदारांनी बैठकीतमांडले आहे.एनडीएत जाण्यास विरोध असणारे आमदार रोहित पवार यांनी या बैठकीपासून स्वतःला अलिप्त ठेवले होते. बैठकीनंतर रोहित पवारांनी सर्व आमदारांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
आमदारांच्याया भूमिकेनंतर आता अंतिम निर्णय शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे. मी तुमची भावना शरद पवारांपर्यंत पोहोचवेन, असे जयंत पाटील यांनी आमदारांना बैठकीच्या शेवटी सांगितले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी स्वतः शरद पवार लवकरच आमदार आणि खासदारांची एकत्र बैठक बोलावणार आहेत. परंतु शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्यातच जमा आहे. लवकरच ते एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र, आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत ही शक्यता फेटाळली. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच माझे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणे झाले. मीडियामध्ये येणार्या या सर्व बातम्या निव्वळ अफवा आहेत. प्रादेशिक पक्ष स्थिर राहू नये, म्हणून मोदी-शहांकडून मुद्दाम असा संभ्रम पसरवला जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत ही घडामोड घडत असताना अजित पवार यांच्या गटात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीवरून धुसफूस सुरू आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव झारखंडचे सच्चिदानंद सिंह यांनी थेट या निवडीला विरोध करीत कायदेशीर नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. ही नोटीस सच्चिदानंद सिंह यांनी पाठवली असली तरी त्यांच्यामागे नेमके कोणाचे डोके आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीत विचारला जात आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षांमध्ये आवश्यक आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे संशयाची सुई प्रफुल्ल पटेल यांच्या दिशेने आहे. तटकरे यांनी मात्र या नोटिशीला अर्थ नाही असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आज सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात मैदानात उतरत पक्षातील विरोधकांवर आपल्या एक्स पोस्टमधून हल्ला चढवला आहे. सच्चिदानंद बाबा कुणाच्या जीवावर नोटीस पाठवतो, असा सवाल करत त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच राहतील. विरोध करणारा सच्चिदानंद बाबा कुणाच्या जीवावर नोटीस पाठवतो हे शोधावेच लागेल. राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल अजित पवारांच्या विचारांवर उत्तम सुरू आहे. मग हे पक्षातील अतृप्त आत्म्यांना कसे सहन होईल बरे? या प्रकरणाचे ‘झारखंड कनेक्शन’ महाराष्ट्रात निघाले, तर अजितदादांचे तळागाळातील कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्यांना तळागाळात नेऊन टाकतील हे अधोरेखित करून ठेवा.
हा उल्लेख करून त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे.
सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर आव्हान देणारी नोटीस पाठवल्याने पक्षात प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध पवार कुटुंब असा उघड संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मिटकरींच्या या पोस्टमुळे या वादात आणखी तेल ओतले गेले आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार कुटुंब या अंतर्गत कलहाचा हा दुसरा अंक आहे, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आमचा संबंध नाही
सच्चिदानंद यांच्या नोटिशीवरून अजित पवार गटात वाद सुरू झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनीही आपल्या या नोटिशीशी काही संबंध नाही, असे सांगत सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झाल्याची भूमिका मांडत आपला बचाव केला. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचा कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे. तर सुनील तटकरे यांनीही असाच सूर लावत सांगितले की, ही नोटीस मी वाचली आहे, नोटिशीत तथ्य नाही. आम्ही उद्या एकत्र बसून या नोटिशीसंदर्भात काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. हा शिस्तभंग आहे का, हे कायदेशीर सल्ला घेऊन ठरवू. तरीही या दोघांवर संशय कायम आहे.










