Rajesh Tope Statement: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या 17 जागांसाठीची रणधुमाळी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस उरले असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, जालना जिल्ह्यातील घनसावंगीचे प्रबळ नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः राजेश टोपे यांनी समोर येत पूर्णविराम दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?
मे 2026 मध्ये होणाऱ्या या विधानपरिषद निवडणुकीत राजेश टोपे हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, असे वृत्त काही माध्यमांमध्ये आले होते. यावर अधिकृत प्रतिक्रिया देत टोपेंनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबतचे सर्व संभ्रम दूर केले आहेत.
“माझ्या भाजप प्रवेशाबाबत मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. मी कुठेही जाणार नाही. मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून, पक्षासोबतच राहणार आहे,” असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.
मराठवाड्याच्या राजकीय समीक्षकांचे लक्ष
एका बाजूला मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि त्यामुळे निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती पाहता, राजेश टोपे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. टोपेंनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा चर्चा सुरू झाल्याने जालन्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात मात्र कमालीची खळबळ उडाली आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित?
शरद पवार गटाचे खंदे नेते आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कमळ हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा – IPL 2026 Final: किंग कोहली vs प्रिन्स गिल! RCB रचणार इतिहास की GT मारणार बाजी? कधी व कुठे पाहता येईल फायनल? वाचा









