Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : लाज वाटली पाहिजे’; फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांचा जोरदार पलटवार, ‘सत्तेचा माज बोलतोय का?

Sanjay Raut : लाज वाटली पाहिजे’; फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांचा जोरदार पलटवार, ‘सत्तेचा माज बोलतोय का?

Sanjay Raut : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ७ हजार कोटी रुपयांच्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पावर दोन...

By: Team Navakal
Sanjay Raut 
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ७ हजार कोटी रुपयांच्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनाचे (Landslide) प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अत्यंत पेटले आहे. या दरड दुर्घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त शब्दांत ट्रोलर्स व विरोधकांचा समाचार घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत बोचरी आणि घणाघाती टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांना सध्या तीव्र वैफल्य आले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे,” अशी आग्रही मागणी राऊत यांनी केली आहे.

“हे छत्रपतींच्या महाराष्ट्रातील सुलतानाचे राज्य”
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, आधी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्पाच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवायचे आणि त्यानंतर हा प्रकल्प पहिल्याच पावसात कोसळून पडतो. जनतेच्या हक्काच्या कराच्या पैशाला भ्रष्टाचाराचे मोठे भगदाड पडते आणि त्यावर जेव्हा त्रस्त झालेली जनता समाजमाध्यमे (सोशल मीडिया), वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाणी (टीव्ही) वाहिनीच्या माध्यमातून व्यक्त होते; तेव्हा त्या जनतेला ‘भाड्याचे टट्टू’ किंवा ‘कुत्रे’ म्हणून त्यांची चेष्टा करायची? हा उद्दामपणा केवळ एखाद्या क्रूर सुलतानाच्या राज्यातच होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात हे सुलतानाचे राज्य सुरू असून त्यांच्या आजूबाजूला जे आधुनिक ‘निजाम’ बसले आहेत, ते काल मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यांवर फिदीफिदी हसत टाळ्या वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असलेली ही सुलतानशाही अत्यंत लाजिरवाणी आहे.

“महाराष्ट्राच्या बदनामीचे सगळ्यात मोठे षड्यंत्र दिल्लीतून”
मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या बदनामीच्या आरोपावर पलटवार करताना राऊत म्हणाले की, जर महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि प्रतिमेची बदनामी करण्याचे सगळ्यात मोठे षड्यंत्र कोणी रचले असेल, तर ते देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचले आहे आणि ‘खाण तशी माती’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. राज्यात चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात सत्य बोलणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी करणे आहे का? तुम्ही स्वतः जेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होता, तेव्हा कोरोना काळापासून ते प्रत्येक विषयावर जे बेफाम आणि बिनबुडाचे आरोप करत होतात, ते जरा तुम्ही एकदा स्वतः जुन्या चित्रफिती ऐकून बघा, असा टोला त्यांनी लगावला.

५० कोटींचे खोके आणि पुतळा कोसळणे ही बदनामी नाही का?
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना जुन्या प्रकरणांची आठवण करून देत विचारले की, “महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार ५०-५० कोटी रुपयांना विकत घेतले गेले, ही या पुरोगामी राज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली बदनामी नाही का? तुम्ही आमदार-खासदार पैशांच्या बळावर विकत घेऊन त्यावर बेकायदेशीर सरकार बनवले, यापेक्षा या राज्याची मोठी बदनामी दुसरी कोणतीही असू शकत नाही. कारण ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा कधीच नव्हती. सिंधुदुर्गातील मालवण येथे केवळ भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळतो, ही या राज्याची बदनामी नाही का? त्याव्यतिरिक्त भगतसिंह कोश्यारी जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तेव्हा त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून थेट छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली, महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला आणि तुम्ही सत्तेसाठी त्याचे मूक समर्थन करत होतात. ही महाराष्ट्राची बदनामी नव्हती का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मिस्टर फडणवीस नैराश्यातून फावडे घेऊन बसलेत”
मुख्यमंत्र्यांच्या मानसिक स्थितीवर थेट भाष्य करताना राऊत पुढे म्हणाले, “मिस्टर फडणवीस हे सध्या अत्यंत वैफल्याने आणि निराशेने ग्रस्त झाले आहेत, ते राजकीयदृष्ट्या पूर्णपणे खचलेले आहेत. त्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर आहोत, तितके दिवस ते हातात भ्रष्टाचाराचे ‘फावडे’ घेऊन बसले आहेत, ज्याचा एकमेव उद्देश फक्त बड्या ठेकेदारांकडून पैसे गोळा करणे हाच आहे. तुमच्या राज्यात दररोज कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून हत्या, खंडणी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? राज्याच्या विधानसभेत तुम्ही दररोज खोटे बोलत आहात. ज्या विधानसभा अध्यक्षांना नीट मराठी भाषा बोलता येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेत संविधानाच्या आणि लोकशाहीच्या सर्व नियमांच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचे निकाल देतात, ही देखील महाराष्ट्राची लोकशाहीत झालेली मोठी बदनामीच आहे.”

“आरएसएसचा खरा इतिहास मी मुख्यमंत्र्यांना पाठवतो”
आपल्या भाषणाचा शेवट करताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला की, तुमच्या भ्रष्टाचारावर जनतेने लोकशाही मार्गाने बोट ठेवले तर ती करदाती जनता तुम्हाला ‘भाड्याचे टट्टू’ किंवा ‘कुत्र्यासारखी भुंकणारी’ वाटते का? ही हुकूमशाही आणि घोषित आणीबाणी महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही, ती निश्चितपणे उधळून लावली जाईल. स्वतःला जगज्जेता समजणारा कोणताही हुकूमशाह या महाराष्ट्राच्या मातीत कधीही टिकू शकलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) नेमका आणि खरा इतिहास काय आहे, तो देवेंद्र फडणवीस यांनी एकदा शांतपणे वाचावा, मी स्वतः त्यांना खऱ्या इतिहासाचे पुस्तक भेट म्हणून पाठवतो. महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी, वाघासारखी शूर आहे, आज ती शांत असली तरी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या