Sheetal Tejwani :दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुत्र व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाने दोन गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. राज्यसभेवर पार्थ पवार यांची नुकतीच खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काहीच दिवसांत तेजवानीला जामीन मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ कायदेशीर प्रक्रियेतील त्रुटींचा परिणाम होता की पोलिसांकडून जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीवेळी अटक व रिमांड प्रक्रियेतील गंभीर त्रुटींचा उल्लेख करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुणे पोलिसांनी अटक करताना अटकेचे स्पष्ट कारण सांगितले नाही, पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी दोन तास आधी सूचना देण्याचा नियम पाळला नाही या बाबींवर न्यायालयाने ताशेरे ओढले. परिणामी, अटक व त्यानंतरचे रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने तेजवानीला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यांसाठी स्वतंत्र 50 हजार रुपयांचा जातमुचलका व तितक्याच रकमेचा जामीनदार देण्याची अट घातली आहे. याशिवाय, पुराव्याशी छेडछाड न करणे, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन न देणे, तपास अधिकाऱ्यासमोर आवश्यकतेनुसार हजर राहणे आणि न्यायालयात नियमित उपस्थिती लावणे या अटीही आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. शीतल तेजवानीवर सेवा विकास बँक घोटाळा आणि जमिनीच्या व्यवहारांत गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत. अटकेनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध न्यायालयात विविध पुरावे सादर केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ती कारागृहात होती. मात्र, आता तांत्रिक मुद्यांवर न्यायालयाने तिला जामीन दिल्याने पोलिसांच्या तपासावर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
खडकी पोलीस ठाण्यातील एफआयआरशी संबंधित तेजवानीची तिसरी याचिका फेटाळली. प्रथमदर्शनी याचिकाकर्तीला अटकेची कारणे तिला समजेल अशा भाषेत देण्यात आली नाहीत, त्यामुळे घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन झाले नाही, हा तिचा दावा मान्य केला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने ही याचिका फेटाकळी. त्यामुळे तेजवानीला तुरुंगातच राहावे लागणार.











