Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (अजित पवार गट) गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत अस्वस्थता आणि नाराजीनाट्य सुरू असून, आता या पक्षासमोर कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांमुळे पक्षात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पत्रांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने, या ज्येष्ठ नेत्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांत निवडणूक आयोगाला दोन वेळा पत्रे पाठवून मागील पत्रे रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत ‘पॉलिटिकल हॉरर’ सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी पत्रांचा तांत्रिक घोळ असून, त्यामागे पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नियुक्त्यांच्या घोषणांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. मात्र, १० मार्च आणि त्यानंतर २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या नावांपुढे त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. सुनेत्रा पवार यांच्या सहीने पाठवलेल्या या पत्रांमुळे पक्षात दोन गट पडल्याचे चित्र असून, “सुनेत्रा वहिनींची सही आणि पार्थ पवारांची शाई” अशा शब्दांत पक्षातील या गोंधळाचे वर्णन केले जात आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारल्यास पक्षाचे भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, भाजपमध्ये नवीन प्रवेशाचे दरवाजे सध्या बंद असल्याने आणि स्वतःच्या पक्षात निर्माण झालेली ही अस्थिरता पाहता, अनेक आमदारांनी आता सावध भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आणण्यासाठी सुनेत्रा पवार स्वतः पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली असून, त्यात आमदारांच्या अडीअडचणी आणि नेत्यांमधील विसंवाद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. काही आमदारांनी तर पक्षाची बिघडलेली घडी सावरण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा, अशी विनंती केल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. एकीकडे तांत्रिक त्रुटींमुळे पदांबाबत संभ्रम निर्माण झाला असताना, दुसरीकडे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात आणि प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्या पदांबाबत असलेली साशंकता त्या कशा प्रकारे दूर करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा ‘पत्र प्रपंच’ राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पक्षात सुरू असलेला हा गोंधळ केवळ तांत्रिक नसून तो नेतृत्वाच्या संघर्षाचे प्रतीक असल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी दूर करणे, हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या मध्यस्थीची मागणी होणे, हे राज्याच्या राजकारणातील एका नव्या समीकरणाची नांदी ठरू शकते.










