Home / महाराष्ट्र / Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; खंडाळा घाटात सुप्रिया सुळेही अडकल्या

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; खंडाळा घाटात सुप्रिया सुळेही अडकल्या

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास वेगवान करण्यासाठी आज ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मात्र, एकीकडे या...

By: Team Navakal
Traffic Jam
Social + WhatsApp CTA

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास वेगवान करण्यासाठी आज ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मात्र, एकीकडे या नव्या मार्गाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे खंडाळा घाटात प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

आज सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील तब्बल २ तास या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडल्या होत्या.

सुप्रिया सुळेंनी व्हिडिओतून मांडली व्यथा

वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गाडीतूनच एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी घाटात लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा दाखवल्या आहेत. त्यांच्या शेजारील गाडीतील एका चालकानेही आपली समस्या मांडली.

“मी सकाळी ७ वाजल्यापासून ठाण्याहून निघालो आहे, पण गेल्या दोन तासांपासून या घाटात एकाच ठिकाणी उभा आहे,” असे हा चालक सांगताना दिसतोय. या परिस्थितीवर सुप्रिया सुळे यांनी, “इथे दोन तासांपासून अडकल्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांमधील लोकांशी आता चांगली मैत्री झाली आहे,” अशी मिश्किल पण खोचक टिप्पणी केली.

“व्हिडिओत दृश्य छान दिसतंय, पण…”

घाटातील स्थितीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इथे नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने अडकले आहेत. लाँग वीकेंड किंवा इतर कार्यक्रमांमुळे गर्दी असू शकते, पण घाटात एकही गाडी हलण्याचे नाव घेत नाहीये. वरून पाहिले तर डोंगरात अडकलेल्या गाड्यांचे दृश्य व्हिडिओत छान दिसते, पण प्रत्यक्षात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.”

प्रशासनाला आणि सरकारला साकडं

या वाहतूक कोंडीसाठी आजचा ‘मिसिंग लिंक’ सोहळा कारणीभूत आहे की अन्य काही कारण, हे स्पष्ट नाही. मात्र, खासदार सुळे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. “हा प्रश्न केवळ माझ्यापुरता मर्यादित नसून सर्व सामान्यांचा आहे. घाटात चढायला सुरुवात केल्यावर नक्की किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही. कधी २० मिनिटांत प्रवास होतो तर कधी दोन तास लागतात. आजच्या या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पोलीस पाठवावेत,” असे आवाहन त्यांनी केले.

मिसिंग लिंकमुळे भविष्यात ही समस्या सुटेल अशी आशा व्यक्त केली जात असली, तरी आजच्या दिवसाने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल केले आहेत.

हे देखील वाचा – Maharashtra Day 2026: 1 मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? वाचा सविस्तर इतिहास

Web Title:
संबंधित बातम्या