Home / देश-विदेश / Board Exam Results : निकालानंतर मेरिटलिस्टच ‘पॉलिटिक्स’ आणि विद्यार्थ्यांचं भविष्य; महाराष्ट्राच्या मातीत राज्य बोर्डाचा विद्यार्थी ‘बॅकफूट’वर का?

Board Exam Results : निकालानंतर मेरिटलिस्टच ‘पॉलिटिक्स’ आणि विद्यार्थ्यांचं भविष्य; महाराष्ट्राच्या मातीत राज्य बोर्डाचा विद्यार्थी ‘बॅकफूट’वर का?

Board Exam Results : इयत्ता १०वी आणि १२वी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि कलाटणी देणारी वर्षे मानली जातात. महाराष्ट्रातील...

By: Team Navakal
Board Exam Results
Social + WhatsApp CTA

Board Exam Results : इयत्ता १०वी आणि १२वी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि कलाटणी देणारी वर्षे मानली जातात. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून, रात्रंदिवस अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षा देतात. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि ‘आयसीएसई’ (ICSE) या सर्वच मंडळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

देशातील प्रमुख शैक्षणिक मंडळांच्या इयत्ता १०वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, यंदाही विद्यार्थ्यांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या जोरावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित शिक्षण मंडळांच्या परीक्षांचे निकाल पाहता, यंदाही उत्तीर्णतेच्या टक्केवारीने नवा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाची कास धरणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या मूल्यमापन पद्धतीत अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली असून, आता सर्वांचे डोळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाकडे लागले आहेत.

केंद्रीय मंडळांच्या निकालांचा नवा विक्रम-
यंदाच्या शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १०वीच्या परीक्षेत ९९.५७% निकालाची नोंद केली आहे. सीबीएसईच्या या अभूतपूर्व यशामुळे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे स्पष्ट होते.

दुसरीकडे, ‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ (CISCE) या मंडळानेही आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. आयसीएसई (ICSE) इयत्ता १०वीचा निकाल ९९.८५% इतका लागला असून, हा निकाल विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांची आणि परीक्षा पद्धतीमधील अष्टपैलुत्वाची साक्ष देतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या दोन्ही प्रमुख मंडळांच्या विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांहून अधिक यश मिळवून आगामी उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी स्वतःचे स्थान अधिक मजबूत केले आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची उत्सुकता आणि तारीख-
केंद्रीय मंडळांच्या या घवघवीत यशानंतर आता राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे लक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १०वीच्या (SSC) निकालाकडे लागले आहे. प्राप्त अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा निकाल मे २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाची नोंद: शिक्षण विभागातील सूत्रांनुसार, १० ते २० मे २०२६ या कालावधीत राज्य मंडळाचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाऊ शकतो.

सध्या राज्य मंडळाकडून उत्तरपत्रिकांचे संकलन, विभागीय मंडळांकडून गुणांची पडताळणी आणि अंतिम निकाल तयार करण्याचे संगणकीय काम अत्यंत वेगाने व सुरक्षितपणे सुरू आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही इतर मंडळांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त असल्याने, मूल्यमापन प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडली जात आहे.

एकत्रित प्रवेश प्रक्रियेतील चुरस वाढणार
सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांचे निकाल ९९ टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे, आगामी अकरावी (FYJC) प्रवेश प्रक्रियेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमधील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असेल.

गुणवत्तेची स्पर्धा: राष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रचंड गुणांमुळे पहिल्या काही गुणवत्ता याद्यांमध्ये त्यांचे वर्चस्व राहण्याची शक्यता असते.

महाविद्यालयीन प्रवेशातील असमानता: विविध परीक्षा मंडळांच्या गुणपद्धतीमुळे महाराष्ट्र बोर्डाच्या गुणवंतांची कोंडी; स्वतंत्र गुणवत्ता यादीची मागणी-
प्रत्येक विद्यार्थी आपल्या परीने जीव ओतून अभ्यास करतो आणि त्याचे उत्तम प्रतिबिंब दरवर्षी लागणाऱ्या निकालांमध्ये उमटते. यंदाही केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, आयसीएसईचा निकाल ९९.८५% तर सीबीएसईचा निकाल ९९.५७% इतका लागला आहे. आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष राज्य मंडळाच्या निकालाकडे लागले असून,तर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थीही तब्बल ९७% ते ९८% किंवा त्याहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन करतात. परंतु, खरा संघर्ष सुरू होतो तो निकालानंतर, जेव्हा अकरावी किंवा पदवीच्या पहिल्या वर्षाच्या महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते.

सध्याच्या प्रवेश पद्धतीनुसार, सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांची एकच एकत्रित गुणवत्ता यादी (Common Merit List) जाहीर केली जाते. या एकाच यादीत तिन्ही बोर्डांच्या विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट असतात. यामुळे गुणांच्या टक्केवारीवर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत मोठी विषमता निर्माण होते. उदाहरणार्थ, जर एखाद्या सीबीएसईच्या विद्यार्थ्याला ९९%, आयसीएसईच्या विद्यार्थ्याला ९८% आणि महाराष्ट्र बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्याला ९७% गुण असतील, अर्थात यात कधी कधी फक्त पॉईंट्सचा सुद्धा फरक असतो. तर यात साहजिकच पहिल्या दोन केंद्रीय बोर्डांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्रथम प्राधान्य मिळते.

या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळताना दिसत आहे. महाराष्ट्र बोर्डातून गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावूनही जर विद्यार्थ्यांना स्वतःच्याच राज्यात, स्वतःच्याच कर्मभूमीत नामांकित महाविद्यालयांमध्ये किंवा हव्या असणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर त्या अव्वल येण्याला काय अर्थ उरतो? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रत्येक बोर्डाची मूल्यमापन पद्धती, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि गुण देण्याचे निकष पूर्णपणे भिन्न असतात. असे असताना सर्वांना एकाच तराजूत तोलणे कितपत योग्य आहे, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पालकांनकडून अशी मागणी केली जात आहे की, प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक बोर्डासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी (Separate Merit List) जाहीर करण्यात यावी. अथवा प्रत्येक बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ठराविक जागांचा कोटा राखीव ठेवण्यात यावा. जर अशी व्यवस्था केली नाही, तर स्थानिक बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत राहील. आपल्याच मातृभूमीत शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणाऱ्या या विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने या प्रवेश नियमावलीचे पुनरावलोकन करून त्वरित ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

उच्च माध्यमिक निकालाची प्रतीक्षा संपली: उद्या जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल; प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या अधिकृतपणे जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य मंडळाकडून उद्या दुपारी निकाल ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार असून, सर्व विभागीय मंडळांनी गुणपत्रिका आणि निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. या निकालामुळे आता विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या दिशेने पडणाऱ्या पहिल्या पावलाचा मार्ग सुकर होणार आहे.

यंदाच्या वर्षी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला आसन क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव नोंदवून एका क्लिकवर आपले गुण पाहता येतील. या निकालाची तारीख जाहीर होताच विद्यार्थ्यांमधील धाकधूक शिगेला पोहोचली आहे. १२वीच्या निकालावरच विद्यार्थ्यांचे पुढील व्यावसायिक शिक्षण, जसे की अभियांत्रिकी, वैद्यकीय, आणि इतर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून असतात. त्यामुळे या निकालाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या