Home / महाराष्ट्र / Supriya Sule : ‘मराठी’चा आग्रह धरणारेच हिंदीच्या प्रेमात? टॅक्सी चालकाशी हिंदीत संवाद साधल्याने सुप्रिया सुळे निशाण्यावर!

Supriya Sule : ‘मराठी’चा आग्रह धरणारेच हिंदीच्या प्रेमात? टॅक्सी चालकाशी हिंदीत संवाद साधल्याने सुप्रिया सुळे निशाण्यावर!

Supriya Sule : महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याबाबतचा मुद्दा चर्चेत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार...

By: Team Navakal
Supriya Sule
Social + WhatsApp CTA

Supriya Sule : महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याबाबतचा मुद्दा चर्चेत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील प्रवासादरम्यान आलेल्या एका अनुभव समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. मुंबईसारख्या महानगरात प्रवाशांना कराव्या लागणाऱ्या संघर्षावर त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रकाश टाकला. सुमारे २२ मिनिटे प्रतीक्षा करूनही टॅक्सी उपलब्ध न झाल्याने आणि एका ‘उबर’ चालकाने त्यांना सेवा देण्यास नकार दिल्याने सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासासाठी टॅक्सी शोधत असताना बराच वेळ वाट पाहूनही त्यांना यश आले नाही. दरम्यान, एका ‘उबर’ टॅक्सी चालकाकडे त्यांनी विचारणा केली असता, त्याने सुप्रिया सुळेंना नकार दिला. यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, जर चालकाला समोरून ग्राहक मिळत असेल आणि त्याच्याकडे प्रत्यक्षात भाडे नसेल, तर केवळ तांत्रिक प्रक्रियेसाठी नकार देण्याचे कारण काय? त्यांनी ‘उबर’च्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सुप्रिया सुळे यांनी हा अनुभव मांडल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकरी म्हणाले, ‘उबर’ किंवा ‘ओला’ सारख्या सेवा पूर्णपणे ॲपवर आधारित असतात. या कंपन्यांच्या नियमांनुसार, चालकाला कंपनीच्या प्रणालीबाहेर जाऊन प्रवासी घेता येत नाही, कारण त्यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता, विम्याच्या अटी आणि कंपनीचे कमिशन अशा अनेक तांत्रिक बाबींचा समावेश असतो. “जर सुप्रिया सुळे यांना उबरने प्रवास करायचा होता, तर त्यांनी रीतसर ॲपवरून नोंदणी करायला हवी होती; विनाकारण चालकावर संताप व्यक्त करणे अनाठायी आहे,” अशी भूमिका काही युजर्सनी मांडली आहे.

सुप्रिया सुळे यांचा ‘उबर’ अनुभव वादाच्या भोवऱ्यात; भाषेचा मुद्दा आणि तांत्रिक नियमांवरून नेटकऱ्यांकडून टीका-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबईतील टॅक्सी प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटू लागले आहेत. हा विषय केवळ प्रवासातील गैरसोयीपुरता मर्यादित न राहता, आता त्यामध्ये भाषिक अस्मिता आणि तांत्रिक नियमावलीचे कंगोरे जोडले गेल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेषतः महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असताना, सुप्रिया सुळे यांनी टॅक्सी चालकाशी संवाद साधताना हिंदी भाषेचा वापर केल्याने टीकाकारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

टॅक्सी मिळवण्यासाठी त्यांना झालेला त्रास आणि उबर चालकाने दिलेला नकार यावर त्या भाष्य करत होत्या. मात्र, हे लाईव्ह सुरू असताना त्या तेथील टॅक्सी चालकांशी संवाद साधताना चक्क हिंदी भाषेचा वापर करताना दिसल्या. एकीकडे मराठी अस्मितेचे राजकारण करायचे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारात मराठीला डावलून हिंदीचा आधार घ्यायचा, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याची भावना समाजमाध्यमांवर व्यक्त केली जात आहे.

“सीधा सीधा भैय्या…” : मराठीच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हिंदी संवादाची समाजमाध्यमांवर चर्चा-
झाले असे की, सुप्रिया सुळे या मुंबईत टॅक्सीने प्रवास करत असताना त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला अनुभव मांडला. यावेळी टॅक्सी चालकाने त्यांना पुढचा रस्ता विचारला असता, सुळे म्हणाल्या, “सीधा सीधा भैय्या, सीधा लेलीजिये और टाटा गार्डन के यहाँसे लेफ्ट लेना है, थँक्यू भैय्या.” एका लोकप्रतिनिधीने, ज्या राज्याच्या भाषेसंदर्भात सध्या एव्हडी मोठी चर्चा सुरू आहे, तिथे चक्क हिंदी भाषेतून सूचना दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘भैय्या’ या संबोधनाचा आणि हिंदी वाक्यांचा वापर केल्यामुळे मराठी अस्मितेचा कैवार घेणाऱ्या नेत्यांच्या दुटप्पीपणाचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका आता नेटिझन्सकडून केली जात आहे.

या संदर्भात नेटकऱ्यांनी सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महाराष्ट्रात राहून आणि मराठी माणसांचे प्रतिनिधित्व करताना, आपल्याच राज्यातील टॅक्सी चालकाशी संवाद साधण्यासाठी त्यांना हिंदीची गरज का भासली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. “मराठी भाषेच्या सक्तीचे समर्थन करणारे नेते जेव्हा स्वतः हिंदीत बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांतील गांभीर्य हरवते,” अशी बोचरी टीका देखील त्यांच्यावर केली जात आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये माणुसकीचा दृष्टिकोन मांडताना म्हटले की, “मला २२ मिनिटे रखरखत्या उन्हात उभे राहावे लागले याचे दुःख नाही, परंतु माझ्या जागी जर एखादी वृद्ध व्यक्ती किंवा गरोदर महिला असती, तर तिला या व्यवस्थेचा किती त्रास सहन करावा लागला असता?” प्रवाशांच्या मूलभूत अधिकारांकडे त्यांनी लक्ष वेधले असले, तरी त्यांच्या मागणीतील तांत्रिक त्रुटींवरही बरीच चर्चा होत आहे. ॲप-आधारित ‘उबर’ किंवा ‘ओला’ सेवांचे नियम स्पष्ट असताना, विना-नोंदणी चालकाला गाडी नेण्याचा आग्रह धरणे हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे. ॲपवरून बुकिंग न करता केवळ रस्त्यावर उभे राहून उबर चालकाला गाडी थांबवण्यास सांगणे आणि त्यावर तो थांबला नाही म्हणून संताप व्यक्त करणे, मूर्खपणाचे असल्याचे देखील बोलले जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या