Uddhav Thackeray And Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका कथित गुप्त भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी मध्यरात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट झाल्याचा दावा एका प्रसिद्धी माध्यमाकडून करण्यात आला. मात्र, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळून लावत या वृत्ताचा ठामपणे इन्कार केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली होती, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
भेटीच्या अफवेची पार्श्वभूमी-
संबंधित बातमीनुसार, २३ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे २ वाजता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट आगामी विधान परिषद निवडणुकांच्या रणनीतीबाबत असावी, असा कयास लावला जात होता. या बातमीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटात खळबळ उडाली होती. तथापि, या संदर्भात जेव्हा खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. “अशी बैठक झाली आहे का, हे केवळ ते दोन नेतेच सांगू शकतील,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण-
नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आपली परखड भूमिका मांडली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि माझी भेट व्हायची असेल, तर ती लपून-छपून करण्याची आम्हाला कोणतीही आवश्यकता नाही. आमची भेट उघडपणेही होऊ शकते. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे लपवून ठेवण्याची गरज पडेल.” अशा प्रकारची कोणतीही भेट झालेली नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या बातम्यांना ‘खोटारडेपणा’ असे संबोधले. तसेच, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सवर कायदेशीर नोटीस बजावली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भाजप प्रवक्त्यांकडून वृत्ताचे खंडन-
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही बातमी पूर्णतः निराधार आणि खोटी आहे. राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यरात्रीच्या भेटीचा दावा केवळ सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला होता, परंतु त्यास कोणताही ठोस आधार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.










