Vidhanparishad Election 2026 : महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यापैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच जागा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाच जागांसाठी उमेदवारांची निश्चिती करताना भाजपमध्ये सध्या मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पक्षाने यावेळी जुन्या-जाणत्या नेत्यांऐवजी संघटनेत सक्रिय असलेल्या नव्या चेहऱ्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबल्याचे सूत्रांकडून समजते.
दिल्लीतून ‘फिल्टर’ लागल्यानंतर सुधारित यादी सादर-
सुरुवातीला महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीने सुमारे ३० संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने ही यादी पाहिल्यानंतर त्यातील अर्धी नावे वगळून पुन्हा फेरविचार करण्याचे आदेश दिले होते. त्या सूचनेनुसार आता राज्याने १४ नावांची सुधारित यादी पुन्हा केंद्राकडे सोपवली आहे. या यादीमध्ये कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः दिल्लीला रवाना झाले असून, केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम पाच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नाराजी टाळण्यासाठी ‘लास्ट मिनिट’ घोषणा-
पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असून, तिकीट न मिळाल्यास कोणाचीही नाराजी ओढवू नये, याची खबरदारी भाजपने घेतली आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजीच अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी मुंबई वगळता राज्यातील उर्वरित पाच विभागांतून भौगोलिक समतोल राखत संधी दिली जाईल. तसेच, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना यावेळी बाजूला सारून, केवळ पक्ष संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या आणि जातीय समीकरणे पूर्ण करणाऱ्या चेहऱ्यांनाच विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
शर्यतीत असलेली प्रमुख नावे-
सध्या भाजपच्या गोटातून अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील नावांचा समावेश आहे:
१.संघटनात्मक चेहरे: डॉ. उपेंद्र कोठेकर, माधव नाईक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे.
२. माजी खासदार व नेते: मनोज कोटक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील.
३. विभागीय नेते: दयाशंकर तिवारी, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे.










